'मी गेममध्ये जिंकलेले पैसे, तू गमावले'; संतापलेल्या रूममेट मावस भावानेच केला प्रदीपचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 13:01 IST2025-01-18T13:00:22+5:302025-01-18T13:01:14+5:30
हातावर जखम, मोबाइलमधील व्यवहार व जबाबातील तफावतीमुळे उलगडले विद्यार्थ्याच्या हत्येचे गूढ

'मी गेममध्ये जिंकलेले पैसे, तू गमावले'; संतापलेल्या रूममेट मावस भावानेच केला प्रदीपचा खून
छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन गेममध्ये जिंकलेल्या १ लाखापैकी मावस भावाच्या खेळण्याने ६५ हजार रुपये गमवावे लागले. या रागातून अवघ्या १७ वर्षीय लहान मावस भावानेच रोज एकाच डब्यात जेवणाऱ्या १९ वर्षीय प्रदीप निपटेची हत्या केली. विशेष म्हणजे, हत्या करून तो दोन दिवस पोलिसांसोबत अश्रू गाळत फिरत राहिला. सोशल मीडियावर भावनिक स्टेटस ठेवले. घटनेच्या ७२ तासांनी गुरुवारी मध्यरात्री पोलिस हे गूढ उकलण्यात यशस्वी ठरले.
मंगळवारी प्रदीपची राहत्या फ्लॅटमध्ये क्रूर पद्धतीने हत्या झाली. पहिल्या दिवसापासूनच १५ मित्रांवर पोलिसांची चौकशी केंद्रित हाेती. त्यांच्या जबाबांतील तफावत, आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू होता. यापैकी प्रदीपच्या लहान मावस भावानेच गुरुवारी रात्री उशिरा गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे वय १७ वर्षे ६ महिने असल्याने बालन्यायालयासमोर हजर करून बालगृहात ठेवण्यात आले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. रणजित पाटील, निरीक्षक अतुल येरमे, सहायक निरीक्षक शिवाजी चौरे, विनायक शेवाळे, उपनिरीक्षक अमित गोरे, प्रवीण वाघ यांनी तपास केला.
एव्हिएटर गेम : विन अँड लॉस
दोन्ही भावांना ऑनलाइन गेम एव्हिएटरचे व्यसन लागले होते. मोबाइल साधा असल्याने प्रदीपच्याच मोबाइलवर गेम खेळत मारेकरी १ लाख रुपये जिंकला. गेमच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होऊन बँक खात्यावर घेतात. प्रदीप मात्र मारेकऱ्याचीच लेव्हल पुढे खेळत ६५ हजार रुपये हरला. अल्पवयीन भावाला हे सहन झाले नाही. प्रदीपने त्याच्याच उधार पैशांची आठवण करून देत परतफेड करण्यासही नकार दिला. ही सल मावस भावाला महिन्याभरापासून सलत हाेती.
हत्येसाठी अभ्यास, नियोजित कट
-एनडीएची तयारी करणाऱ्या मारेकऱ्याने प्रदीपच्या हत्येसाठी नियोजित कट रचला. महिन्याभरापूर्वी त्याने मित्राकडून चाकू घेतला. मकर संक्रांतीला बाकीचे एकाच वेळी बाहेर गेले. त्यातच प्रदीपचे दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयात वाद झाले होते. त्याचे कारण सांगून पोलिस चौकशीला फाटे फोडता येतील, हाही विचार मारेकऱ्याने केला. मंगळवारी दुपारी वादात प्रदीपने त्याच्या कानशिलात लगावली होती. सायंकाळी प्रदीप पालथा झोपलेला असतानाच त्याने खून केला.
असा उलगडा घटनाक्रम
-मारेकऱ्याने पुरावे नष्ट करण्याचा सातत्याने ऑनलाइन अभ्यास केला.
-पोलिसांना त्याच्या मोबाइलमध्ये दोघांतील आर्थिक व्यवहार दिसले. त्यातच दोन वेळेस जबाबात तफावत आली. प्रदीपसोबतच्या झटापटीतील हाताच्या जखमेचे उत्तर देता आले नाही.
-मंगळवारी सायंकाळी मेसचालक डबा ठेवण्यासाठी गेला असता प्रदीप झोपलेला होता. घरात अंधार होता. मारेकरी घाईघाईत हॉलमध्ये आला. पोलिसांना मात्र त्याने पहिल्यापासून तो बाहेर गेला होता, असे सांगितले.