दुग्ध व्यवसायातून युवा शेतकऱ्याने अल्पावधीतच साधली आर्थिक प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 01:07 PM2018-12-26T13:07:24+5:302018-12-26T13:08:10+5:30

यशकथा : या तरुण शेतकऱ्याने शेतीतून उत्पन्न मिळणे दुरापास्त झाल्याने शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा सुरू केला.

The young farmer has achieved financial progress in a short span of milk business | दुग्ध व्यवसायातून युवा शेतकऱ्याने अल्पावधीतच साधली आर्थिक प्रगती

दुग्ध व्यवसायातून युवा शेतकऱ्याने अल्पावधीतच साधली आर्थिक प्रगती

googlenewsNext

-  गजानन बडक  ( औरंगाबाद) 

नोकरीच्या वाटा अवघड वाटल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील पळशी, ता. सिल्लोड येथील गणेश बारकू जोनवाळ या तरुणाने शेतीचा मार्ग धरला. मात्र, जिल्ह्यात सर्वदूर दुष्काळ असल्याने शेतीतून उत्पन्न मिळणे दुरापास्त झाल्याने शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा सुरू केला. यात अल्पावधीतच गणेश याने यशस्वीरीत्या प्रगती करून आर्थिक उन्नती साधली आहे.

पळशी हे छोटे गाव असून, या गावातील बहुतांश नागरिक हे शेती करतात. गणेश जोनवाळ या तरुणाचे शिक्षण बारावीपर्यंत झाल्यानंतर त्याला पुढे शिकण्याची खूप इच्छा होती. मात्र, घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला पुढील शिक्षण घेणे शक्य झाले नाही. इतर तरुणांप्रमाणे औरंगाबादेत एखाद्या कंपनीत काम करण्याचा त्याचा मानस होता. अर्थात कुटुंबियांनाही गणेशने नोकरी करावी, अशीच इच्छा होती. कारण दुष्काळामुळे शेतीतून काहीही हाती लागत नसल्याचा अनुभव त्यांना होता. मात्र, गणेश नुसते शेती क्षेत्र निवडून थांबला नसून, त्याने यासोबतच शेतीपूरक जोडधंदा करण्याचे ठरविले. मित्रांसोबत चर्चा करून तसेच इतर ठिकाणाहून माहिती मिळवून गणेश दुग्ध व्यवसायाकडे वळला.

गणेशकडे शेतीक्षेत्र कमी होते, तसेच त्याच्याकडे आर्थिक गणित जुळत नसल्याने सुरुवातीला एक गाय घेऊन त्याने दुग्ध व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय परवडत असल्याने हळूहळू त्याची आर्थिक उन्नती होत गेली. यातून त्याने हळूहळू गायींची संख्या वाढविणे सुरू केले. आज गणेशकडे १३ गायी व दोन म्हशी आहेत. दररोज ९० ते १०० लिटर दूध हा तरुण दूध संकलन केंद्रात देतो. संकलन केंद्रात दुधाला २३ ते २६ रुपये दर मिळत असल्याने महिन्याकाठी सर्व खर्च वजा जाता गणेशला ४५ ते ५० हजार नुसता नफा राहत असल्याचे गणेशने सांगितले.

गत तीन-चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने चारा व पाणीटंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत नियोजन आवश्यक आहे. गणेशने चाऱ्याचे नियोजन करण्यासाठी बाहेरील  जिल्ह्यामधून चारा आणून व्यवसायात खंड पडू दिला नाही. पाण्याचे नियोजनही त्याने काटेकोरपणे केलेले आहे. दररोज इतके दूध काढण्यासाठी मोठी शारीरिक कसरत करावी लागत असे. दररोज एक तास नुसते दूध काढायला खर्ची घालावा लागत होता. हे श्रम थांबविण्यासाठी गणेशने ६५ हजार रुपये खर्च करून दूध काढण्याचे आधुनिक यंत्र विकत आणले आहे. या यंत्रात वीज नसली तर जनरेटरची देखील सोय केली आहे. या मिल्क यंत्रामुळे अवघ्या १५ मिनिटांत दूध काढले जात असल्याने वेळ व शारीरिक त्रास कमी झाला आहे.

निसर्गाच्या वेळोवेळी होत असलेल्या अवकृपेमुळे सुशिक्षित तरुणांनी कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसायाकडे वळले पाहिजे, असे गणेश सांगतो. यासाठी शासनाकडूनही विविध योजना राबविण्यात येत असून, त्यासाठी अनुदानही मिळत असल्याने तरुणांना जोडधंदा अवघड नसल्याचे तो सांगतो.

Web Title: The young farmer has achieved financial progress in a short span of milk business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.