दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावताच तरुणाने पाठलाग करून आरोपीस पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 07:24 PM2018-07-14T19:24:30+5:302018-07-14T19:25:30+5:30
वडिलांची औषधी आणण्यासाठी जाणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या मोपेडस्वार तीन चोरट्यांपैकी एकाला सिनेस्टाईल पाठलाग करून तरुणाने पकडले.
औरंगाबाद : वडिलांची औषधी आणण्यासाठी जाणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या मोपेडस्वार तीन चोरट्यांपैकी एकाला सिनेस्टाईल पाठलाग करून तरुणाने पकडले. यावेळी तरुणासोबत झटापट करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. ही थरारक घटना शुक्रवारी सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास एमजीएम रुग्णालयाजवळ घडली.
रोहित अनिल बेहडे (१८, रा. एन-७ सिडको) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बेगमपुरा भागातील प्रगती कॉलनी येथील सैफ अली खानचे वडील काही दिवसांपासून आजारी आहेत. आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सैफ अली खान आणि त्याच्या अन्य नातेवाईकांनी रुग्णाला एमजीएममध्ये दाखल केले होते.
तेथील डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधीची चिठ्ठी घेऊन तो औषधी आणण्यासाठी रुग्णालयाच्या बाहेरील औषधी दुकानाकडे मोबाईलवर बोलत जात होता. त्याचवेळी मागून आलेल्या मोपेडस्वार तीन चोरट्यांपैकी एकाने सैफच्या हातातील मोबाईल हिसकावला आणि ते सुसाट जाऊ लागले. यावेळी प्रसंगावधान राखून सैफने चोर-चोर म्हणून ओरडाओरड करीत चोरट्यांचा पळत पाठलाग सुरू केला. काही अंतरावर त्याने मोपेडवर सर्वात मागे बसलेल्या एकाला पक डल्याने तो मोपडेवरून खाली पडला. त्यावेळी त्याचे साथीदार न थांबता त्याला सोडून सुसाट निघून गेले. यावेळी चोरटा सैफसोबत झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला असता नागरिक मदतीला धावले आणि त्यांनी चोरट्याला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती सिडको पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
उपविभागीय अधिकारी आमले यांनी केली मदत
औरंगाबाद ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आमले हे त्याचवेळी त्यांच्या शासकीय वाहनातून कार्यालयात जात होते. यावेळी त्यांनी हद्दीचा विचार न करता गर्दी पाहून त्यांचे वाहन थांबविले. यावेळी त्यांनी प्रथम जमावाच्या तावडीतून चोरट्याला ताब्यात घेऊन त्यांच्या वाहनात बसविले. त्यानंतर ते आरोपीला सिडको ठाण्यात घेऊन गेले. काही वेळानंतर घटनास्थळी सिडको पोलिसांनी धाव घेतली. सैफ आणि त्याच्या नातेवाईकांनी सिडको ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार नोंदविली. सैफ याचा १३ हजाराचा मोबाईल चोरून नेण्यात आला.