हॉटेलमध्ये चाकू, दगडाने हल्ला झालेल्या तरुणाचा मृत्यू; पोलिस येताच मारेकऱ्याचे स्वतःवर वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:37 IST2025-04-08T18:37:09+5:302025-04-08T18:37:29+5:30
मारेकरी आत्महत्येच्या तयारीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कुशलतेने परिस्थिती हाताळत त्याला ताब्यात घेतले.

हॉटेलमध्ये चाकू, दगडाने हल्ला झालेल्या तरुणाचा मृत्यू; पोलिस येताच मारेकऱ्याचे स्वतःवर वार
छत्रपती संभाजीनगर : तीन दिवसांपूर्वी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सागर सुखदेव ढोकळे (वय २३) यांचा सोमवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अटक अटळ दिसताच एका मारेकऱ्याने खोलीत कोंडून घेत चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, चिकलठाणा पोलिसांनी सतर्कता दाखवत चाकू हिसकावून त्याला ताब्यात घेतले.
मुकुंदवाडीतील शिवशाहीनगरमध्ये कुटुंबासह राहणारे सागर एका मेडिकल एजन्सीमध्ये कामाला होते. ५ एप्रिल रोजी रात्री ते बीड बायपासवर ‘हॉटेल तडका’त गेले होते. तेव्हा काही टवाळखोर हॉटेलमध्ये धिंगाणा घालत होते. त्यांनी सागर यांना नाहक शिवीगाळ केली. मांडी, पोटात चाकूने वार केले. एकाने डोक्यात दगड घातला. त्यांना जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रविवारी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सोमवारी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
स्वतःवर चाकूने वार
सागर यांच्या मृत्यूनंतर चिकलठाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रविकिरण दरवडे, सहायक निरीक्षक समाधान पवार, उपनिरीक्षक सतीश पंडित यांनी रुग्णालयात धाव घेतली. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. हल्लेखोरांपैकी राहुल सिद्धेश्वर भोसले हा त्याच्या हनुमाननगरच्या घरी आल्याचे समजले. दरवडे, पवार तेथे गेले. मात्र, भोसलेने आरडाओरड सुरू केली. घरात कोंडून घेत चाकूने स्वत:वर वार केले. तो आत्महत्येच्या तयारीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कुशलतेने परिस्थिती हाताळत त्याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तेरा दिवसांपूर्वी मुलगा झाला
सागर यांचे वडील खासगी नोकरी करतात. सागर यांना दीड वर्षाची मुलगी असून, १३ दिवसांपूर्वीच त्यांना मुलगा झाला होता. पत्नी व बाळावरही घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.