पायावर बायपास शस्त्रक्रियेने असह्य वेदनेतून तरुण मुक्त; सतत उभे राहून नोकरीने नस 'ब्लॉक'
By संतोष हिरेमठ | Published: December 13, 2023 12:38 PM2023-12-13T12:38:59+5:302023-12-13T12:40:27+5:30
तरुणाच्या पायाची रक्तवाहिनी ‘ब्लाॅक’,शासकीय रुग्णालय घाटीत झाली मोफत ‘पेरीफेरल बायपास’ शस्त्रक्रिया
छत्रपती संभाजीनगर : एका कंपनीत सुपरवायझर म्हणून सतत उभे राहून काम करणाऱ्या तरुणाच्या डाव्या पायाची रक्तवाहिनी पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे रक्ताभिसरण होत नव्हते. परिणामी, तरुणाच्या पायात असह्य वेदना होत होत्या. अनेक डाॅक्टरांकडे दाखवूनही फरक पडला नाही. या तरुणाची ‘पेरीफेरल बायपास’ शस्त्रक्रिया करून घाटीतील डाॅक्टरांनी तरुणास वेदनामुक्त करण्याची किमया केली.
घाटीतील सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया झाली. यानिमित्ताने घाटीत तब्बल ५ वर्षांनंतर अशाप्रकारची शस्त्रक्रिया झाली. ढाकळगाव (ता. अंबड, जि. जालना) येथील तरुणाला सुपरवायझर म्हणून कंपनीत सतत उभे राहून काम करावे लागत होते. त्यामुळे त्याचा डावा पाय सतत दुखत असे, पायाची आग होत असे. त्यामुळे त्याला झोपही लागत नसे. अनेक डाॅक्टरांना दाखवून वेदना कायम राहिल्याने अखेरीस तरुण घाटीत दाखल झाला. त्याला ॲडमिट करून घेतल्यानंतर प्रारंभी इंजेक्शनद्वारे त्याच्या पायाचे दुखणे कमी करण्यात आले. सर्व तपासण्यांनंतर ६ डिसेंबर रोजी पायाच्या रक्तवाहिनीची ‘पेरीफेरल बायपास’ करण्यात आली.
अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डाॅ. सुधीर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डाॅ. सरोजिनी जाधव, पथकप्रमुख डाॅ. सुरेश हरबडे, डाॅ. अब्दुला अन्सारी यांच्या पथकात या तरुणास भरती करण्यात आले. त्यानंतर सीव्हीटीएस विभागप्रमुख डाॅ. आशिष भिवापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. सदानंद पटवारी, डाॅ. हुसेन शेख यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. भूलतज्ज्ञ डाॅ. सुचिता जोशी, डाॅ. अंकिता बियाणी, नर्सिंग स्टाफ मेघना गावीत, परिचारिका स्नेहलता, नदीम शेख, नितीन पठारे यांचे सहकार्य मिळाले. या शस्त्रक्रियेसाठी खाजगीत जवळपास ३ लाख रुपयांचा खर्च येतो. घाटीत योजनेंतर्गत ती पूर्णपणे मोफत झाली.
पेरीफेरल बायपास म्हणजे काय?
तंबाखू आणि बीडीच्या सेवनासह अनेक कारणांनी पायाला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी बंद पडते. त्यासाठी त्याच पायातली दुसरी रक्तवाहिनी वापरून रक्तवाहिन्यांची बायपास शस्त्रक्रिया करण्यात येते, असे डाॅ. सदानंद पटवारी यांनी सांगितले.