तरुणास गाडीत टाकताना अपहरणकर्त्यांचा मोबाइल खाली पडला अन् पोलिसांनी डाव उधळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:09 IST2025-01-10T14:05:45+5:302025-01-10T14:09:12+5:30
पोलिस आयुक्तांपासून सर्व वरिष्ठांची धावाधाव; विशेष म्हणजे, अपहरण झालेल्या तरुणाने तक्रार देण्यास नकार देत अपहरण केलेल्या तरुणांसोबत तडजोड केली.

तरुणास गाडीत टाकताना अपहरणकर्त्यांचा मोबाइल खाली पडला अन् पोलिसांनी डाव उधळला
छत्रपती संभाजीनगर : पैशांच्या वादातून एका तरुणाचे सिटीचौक परिसरातून भर दिवसा अपहरण करण्यात आले. या झटापटीत अपहरणकर्त्यांचा घटनास्थळी पडलेला मोबाइल पोलिसांच्या हाती लागला आणि अपहरणाचा डाव उधळला. या अपहरण नाट्यामुळे मात्र पोलिस आयुक्तांपासून सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांची तब्बल सहा तास धावपळ उडाली. गुरुवारी दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा नाट्यमय प्रकार घडला.
पश्चिम बंगालचा असलेल्या अंदाजे ३० वर्षीय तरुण सराफा कारागीर आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याने पाचोड परिसरातील तरुणांसोबत सोने खरेदी विक्रीतून ७ लाख रुपयांचा व्यवहार केला होता. त्या व्यवहारातून त्यांच्यात वाद झाले आणि सदर तरुणाने पाचोडच्या तरुणांसोबतचा संपर्क बंद केला. तेव्हापासून पाचोडचे तरुण त्याच्या शोधात होते. गुरुवारी दुपारी १ वाजता सिटीचौकातील रोहिलागल्ली परिसरात त्याचा पाठलाग करून त्याला बळजबरीने कारमध्ये बसवून ते पसार झाले. भर रस्त्यावर आरडाओरड, धक्काबुक्की करून तरुणाचे अपहरण झाल्याने सगळेच आवाक् झाले आणि तरुणाच्या अपहरणाची वार्ता वाऱ्यासारखी पसरली.
मोबाइल पडला अन्...
या धक्काबुक्कीत ऋषिकेश नामक तरुणाचा मोबाइल घटनास्थळीच पडला. नागरिकांनी मोबाइलसह सिटीचौक पोलिस ठाणे गाठले. निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक अजित दगडखैर यांना सर्व प्रकार सांगितला. पासवर्डमुळे पोलिसांना तो अनलॉक करता आला नाही. काही मिनिटांत त्यावर कॉल आला आणि नेमका अधिकाऱ्यांनी रिसिव्ह केला. पोलिसांकडे आपला मोबाइल मिळाल्याचे कळताच सर्व मोबाइल बंद झाले आणि काही मिनिटांत अपहरण केलेल्या तरुणाला अचानक रस्त्यातच सोडून त्यांनी पळ काढला.
आयुक्तांपासून सगळ्यांची धावाधाव
पोलिसांना प्रथमदर्शनी मोबाइल ऋषिकेशचा असून त्याचेच अपहरण झाल्याचे जाणवले. ऋषिकेशच्या कुटुंबालाही संपर्क केला गेला. मात्र, त्यांनाही प्रतिसाद न दिल्याने गोंधळ आणखी वाढला. दुसरीकडे या घटनेमुळे पोलिस हादरून गेले होते. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त संपत शिंदे सर्वच घटनास्थळी दाखल झाले. सिटीचौक पाेलिस, गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांनी फुटेज तपासून पैठण मार्गावरही लागले. तोपर्यंत पाचोड पोलिस सदर तरुणांच्या घरी पोहोचले अणि सायंकाळी ऋषिकेशच अपहरणाच्या कटात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अपहरण झालेला तरुणही पाचोड ठाण्यात पोहोचला होता.
तक्रार देण्यास नकार
अपहरण झालेल्या तरुणाने रात्री तक्रार देण्यास नकार देत अपहरण केलेल्या तरुणांसोबत तडजोड केली. सिटीचौक पोलिसांनी सर्वांना शुक्रवारी अधिक चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली.