तरुणाने ‘ऑनलाइन गेम’मध्ये उडविले कुटुंबियांचे ३० लाख, आता मनोरुग्णालयात घेतोय उपचार
By संतोष हिरेमठ | Published: February 19, 2024 01:58 PM2024-02-19T13:58:18+5:302024-02-19T13:58:53+5:30
कुटुंबाची आयुष्यभराची कमाई गेली, अनेक तरुणांवर सुरू उपचार
छत्रपती संभाजीनगर : बक्कळ पैसा कमावून देण्याचे आमिष दाखविणारे ऑनलाइन गेम अनेकांच्या आयुष्याचाच गेम करीत आहे. एका तरुणाने कुटुंबाची आयुष्यभराची कमाई म्हणजे तब्बल ३० लाख रुपये ऑनलाइन गेममध्ये उडविले. त्याची सवय काही सुटत नव्हती. त्यामुळे शेवटी आई-वडिलांनी त्याला शहरातील एका मनोरुग्णालयात भरती केले. हा एकच तरुण नाही, तर ऑनलाइन गेमच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांवर उपचार सुरू आहेत.
आणखी एका तरुणावर उपचार सुरू आहे. ऑनलाइन गेम खेळण्यासाठी अनेकांकडून त्याने उसने पैसे घेतले; परंतु तोदेखील पैसे हरत गेला. उसने पैसे परत करण्यासाठी अनेकजण त्याच्या मागे लागले आहेत. गेम खेळण्याचे व्यसन सुटत नसल्याने शेवटी त्यालाही पालकांनी मनोरुग्णालयात दाखल केले.
घाटी रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागातील डाॅ. प्रदीप देशमुख म्हणाले, ऑनलाईन गेमिंगमध्ये मोठी रक्कम जिंकलेल्या विजेत्यांची (जे काल्पनिक असण्याची शक्यता जास्त आहे) प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते. झटपट पैसा कमविण्याची संधी समजून बऱ्याचजणांना त्याची भुरळ पडते. येथूनच गेमिंगची सुरुवात होते आणि सवय लागते.
३० लाख गमावलेल्या, मनोरुग्णालयात दाखल तरुणाशी संवाद
प्रश्न : तू ऑनलाइन गेम खेळतो, त्यात घरच्यांचे पैसे हरला, असे आई-वडिलांनी म्हटले, हे खरे आहे?
तरुण : हो, मी खेळतो. हा ‘....’ गेम. एकदा मी पैसे लावले. त्यात जिंकलो. नंतर परत खेळलो. परंतु खूप पैसे हरलो.
प्रश्न : तू घरच्यांच्या खात्यातून पैसे कसे काढायचास?
तरुण : मला फक्त यूपीआय कोडची गरज पडली. कोड माहीत झाला. मग काही अडचण आली नाही. मला प्रत्येक वेळेस वाटत होते, मी मागचा लाॅस यावेळी जिंकून भरून काढेन, पण दरवेळेस हरत गेलो.
प्रश्न : पुढच्या आयुष्यात परत खेळणार का ?
तरुण : खेळणार नाही. काॅलेज पूर्ण करेन पुण्याला जाऊन.
नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा खेळतात
दारू, गांजा, चरस याप्रमाणे ऑनलाईन गेमिंग हेही एक व्यसन आहे. सुरुवातीला याचे आकर्षण वाटते. पुढे न खेळल्यास अस्वस्थता जाणवू लागते. त्यामुळे खेळावे लागते. कधी चुकून जिंकले तर बरे वाटते. पुन्हा आकर्षण बळावते. असे दुष्टचक्र चालू होते. आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा पुन्हा खेळावे, असे वाटते. सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, मानसिक नुकसान होते. समुपदेशन आणि औषधाची ट्रीटमेंट आवश्यक ठरते.
- डाॅ. आनंद काळे, मनोविकारतज्ज्ञ.
ऑनलाईन गेम म्हणजे जुगारच
ऑनलाईन गेम म्हणजे जुगारच आहे. त्याचे अनेकांना व्यसन लागत आहे. पालकांनी मुलांकडे वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
- डाॅ. मेराज कादरी, मनोविकारतज्ज्ञ
बेचैनी, चिडचिडेपणा, नैराश्य
ऑनलाईन गेमिंगचे प्रमाण वाढले आहे. तरुणवर्गात त्याबाबत उत्सुकता आहे. गेमिंगचा अतिवापर हा बेचैनी, चिडचिडेपणा, नैराश्य, एकलकोंडेपणा, झोपेच्या समस्या निर्माण करत आहे. ज्याचा एकंदरीच परिणाम व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर, शैक्षणिक प्रगतीत आणि नातेसंबंधांवर होताना दिसत आहे.
- डाॅ. अमोल देशमुख, मनोविकारतज्ज्ञ