हातावर मेंदी काढण्याची घटिका आली अन् नवरदेवाने हुंड्यासाठी मोडले लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 02:54 PM2021-04-27T14:54:29+5:302021-04-27T14:58:41+5:30
young man refused to marry after taking dowry नवरदेवाने साखरपुड्यात २ लाख रुपये रोख आणि मोटारसायकल घेण्यासाठी ५० हजार रुपये रोख घेऊनही आणखी पैशांची मागणी केली
औरंगाबाद: लग्नाला अवघे ७ दिवस राहिले असताना नवरदेवाने हुंड्यासाठी लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार मुकुंदवाडी परिसरात घडला. नियोजित वधूने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नवरदेवासह त्याची आई, वडील, भाऊ आणि दोन मध्यस्थाविरूद्ध गुन्हा नोंदविला. नवरदेव अनिल जगन राठोड, त्याचे वडील जगन भीमा राठोड, भाऊ अनिल राठोड, मध्यस्थ रमेश खुबा राठोड, सुनील राठोड आणि महिलेचा आरोपीत समावेश आहे.
२१ वर्षीय तरुणी आणि अनिल राठोड यांची १७ मार्च रोजी बोलणी होऊन रितीरिवाजाप्रमाणे विवाह ठरला. यानंतर १९ मार्च रोजी ३० ते ४० नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा झाला. यावेळी २ लाख रुपये रोख आणि नवरदेवाला मोटारसायकल घेण्यासाठी ५० हजार रुपये रोख दिले गेले. लग्न मुहूर्त तारीख २२ एप्रिल निश्चित करण्यात आली. वधूपित्याने लग्नाची जय्यत तयारी सुरू केली. लग्नाच्या बस्त्यासाठी सुमारे १० हजार रुपये खर्च करण्यात आले. यानंतर १ लाख १ हजाराचे सोन्याचे दागिने खरेदी करण्यात आले. याचदरम्यान नवरदेवाच्या कुटुंबाकडून वधू पित्याकडे राजाराणी कपाट, सोफा फर्निचर, दिवाणची मागणी करण्यात आली. आईच्या नावावरील बॅंकेची मुदत ठेव मोडून दुचाकी घेण्यासाठी ५० हजार रुपये नवरदेवाला दिले. यानंतर आणखी मागणी सुरू झाल्यावर वधूने नाराजी व्यक्त केली. असे असताना लग्न मोडू नये म्हणून वधूपित्याने त्यांची मागणी मान्य केली. लग्नासाठी किराणा सामान खरेदी केले. त्यांनी सुमारे ४ लाख रुपये खर्च केला होता. याचदरम्यान १४ एप्रिल रोजी मध्यस्थ रमेश राठोड यांनी वधूपित्याला फोन करून नवरदेवाने लग्नाला नकार दिल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर तो पळून गेल्याचे सांगितले.
वधू मंडळीला धमकावलेही
नवरदेव मुलाने लग्नाला नकार दिल्याचे सांगणाऱ्या मध्यस्थ रमेश राठोड याला वधूच्या नातेवाईकांनी जाब विचारताच त्याने त्यांना तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकी दिली. या घटनेनंतर वधूने मुकुंदवाडी ठाण्यात आरोपीविरुध्द तक्रार नोंदविली. पोलिसांनी तपास सुरू केला.