बुढीलेन भागात गोळीबार करून तरुण फरार; एक जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:32 PM2021-01-29T12:32:19+5:302021-01-29T12:39:34+5:30
Crime News बुढीलेनकडून नेहरू भवनकडे जाणाऱ्या छोट्या रस्त्यावर मागील अनेक वर्षांपासून भंगाराचे एक मोठे गोदाम आहे. येथील रस्त्यावर झाला गोळीबार.
औरंगाबाद : जुन्या शहरातील अत्यंत गजबजलेल्या बुढीलेन भागातील भंगारच्या दुकानाजवळ किरकोळ कारणावरून एका तरुणाने गावठी कट्ट्याने तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात मांडीवर गोळी लागून एक तरुण जखमी झाला. त्याला त्वरित घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी भेट देऊन पाहणी केली. गोळीबार करणारा तरुण पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत होते.
सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले की, बुढीलेनकडून नेहरू भवनकडे जाणाऱ्या छोट्या रस्त्यावर मागील अनेक वर्षांपासून भंगाराचे एक मोठे गोदाम आहे. या गोदामाच्या पाठीमागे चिमण्या राजाच्या हवेलीजवळ काही नागरिक राहतात. या घरांना भंगाराच्या गोदामाजवळून एक रस्ता आहे. या रस्त्यावर रात्री ११ वाजेच्या सुमारास भंगाराचे साहित्य टाकले होते. मोठी वाहने उभी होती. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता नव्हता. अब्दुल रजाक या तरुणाने आमचा रस्ता का आडवला, असा प्रश्न भंगारमालक राजासेठ यांना केला. त्यातून वाद वाढत गेला. राजासेठ यांचा चालक अक्रम तेथे घटनास्थळी आला. त्याने मागचा-पुढचा विचार न करता ६ एमएम गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. गोळीबारानंतर खळबळ उडाली. राजासेठ यांनी त्याला समजावून पाठवून दिले. त्यानंतर ५ मिनिटांनंतर तो पुन्हा घटनास्थळी आला. त्याने गावठी कट्ट्याने दोनदा गोळ्या झाडल्या. यामध्ये रज्जाक यांचा भाऊ अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार (२४) याच्या पायाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलीस आयुक्त १० मिनिटांत घटनास्थळी
पोलीस आयुक्त निखिल गुप्ता अवघ्या १० मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दोन राउंड आढळले. त्यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तपासासंदर्भात सूचना दिल्या. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे असून, त्याचे फुटेज त्वरित घ्या आणि आरोपीला शोधा, असे निर्देश त्यांनी दिले.