लग्नास नकार दिल्याने तरुण संतापला; मुलीच्या असाह्यतेचा फायदा घेत सोशल मीडियात केली बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 05:33 PM2021-08-26T17:33:09+5:302021-08-26T17:33:55+5:30
तरुणीने नकार दिल्यामुळे त्याने साेशल मीडियावर ती छायाचित्रे टाकून बदनामी सुरू केली.
औरंगाबाद : मुलीचे वडील अर्धांगवायूच्या धक्क्याने अंथरुणाला खिळून पडलेले आणि दुसऱ्या बाजूला सावत्र आई. या असाह्यतेचा गैरफायदा घेत वसाहतीत राहणाऱ्या व ट्रॅव्हल्सवर नोकरी करणाऱ्या तरुणाने त्या तरुणीसोबत मैत्री केली. या मैत्रीच्या नात्यातून काढलेल्या फोटोंच्या आधारे ब्लॅकमेल करीत तो लग्नासाठी ब्लॅकमेल करू लागला. तरुणीने नकार दिल्यामुळे त्याने साेशल मीडियावर ती छायाचित्रे टाकून बदनामी सुरू केली. त्यामुळे तरुणीने ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी झटपट कारवाई करीत आरोपीला बेड्या ठोकल्या.
गारखेडा, हनुमान नगरातील तरुणी व त्याच वसाहतीत राहणारा राहुल राजू रॉय (२२, रा. पुसद, जि. यवतमाळ, ह.मु. हनुमाननगर, गारखेडा) याने त्या तरुणीसोबत मैत्री केली. तो एकटाच राहत होता. येणारा पगार खाणे, फिरणे यावरच उडवत असायचा. तरुणीसोबत फिरतानाचे, सोबतचे छायाचित्र काढले होते. काही दिवसांनी त्याने तरुणीला लग्नाची मागणी घातली; मात्र तिने नकार दिला. लग्न करण्यास ती होकार देत नसल्यामुळे तिला अद्दल घडविण्यासाठी त्याने सोशल मीडियात तिच्या नावाने बनावट खाते काढले. त्यावर बदनामी करणारे छायाचित्र टाकत होता.
सुरुवातीला त्यास समज देण्यात आली होती; मात्र त्याचे प्रकार थांबले नाहीत. यामुळे तरुणीने औरंगाबाद ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नाेंदवली. या तक्रारीची पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बारकाईने तांत्रिक तपास केला. तरुणीचे छायाचित्र वेगवेगळ्या खात्यावरून टाकणारा राहुल रॉय हाच असल्याचे स्पष्ट झाले. यावरून त्यास पोलिसांनी अटक केली. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाइल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक घुगे, हवालदार कैलास कामठे, संदीप वरपे, रवींद्र लोखंडे, नितीन जाधव, योगेश मोईम, सविता जायभाय, लखन पचोळे, योगेश दारवंटे, गजानन बनसोड, मुकेश वाघ, रुपाली ढाेले यांच्या पथकाने केली.