आत्महत्या करण्यासाठी निघालेला युवक बनला कादंबरीकार, मराठी साहित्य विश्वात ‘टिश्यू पेपर’चा गाजावाजा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 12:44 PM2021-08-02T12:44:58+5:302021-08-02T12:45:04+5:30
स्वस्त धान्य दुकानात हक्काचं रेशन मिळत नाही. रेशन मागितलं तर दुकानदार अपमानास्पद वागणूक देत हाकलून देतो. याची प्रशासनाकडे दाद मागितली पण काही उपयोग झाला नाही.
- राम शिनगारे
औरंगाबाद : स्वस्त धान्य दुकानात हक्काचं रेशन मिळत नाही. रेशन मागितलं तर दुकानदार अपमानास्पद वागणूक देत हाकलून देतो. याची प्रशासनाकडे दाद मागितली पण काही उपयोग झाला नाही. त्यामुळे निराश झालेल्या युवकाने आत्महत्या करण्याविषयी सोशल मीडियात पोस्ट टाकली आणि घरातून निघून गेला. पोस्ट वाचून मित्रांनी त्याचा शोध घेऊन त्याला त्या विचारापासून परावृत्त केले. त्याच युवकाची स्वत:च्या जगण्याच्या संघर्षावर बेतलेली ‘टिश्यू पेपर’ ही कादंबरी मराठी साहित्य विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे.
जालना जिल्ह्यातील पिंपळगाव कडचा रमेश रावळकर हा युवक १९९५ साली औरंगाबादेत दाखल झाला. घरची परिस्थिती बेताची... मात्र, चिकाटीच्या जोरावर त्याने पीएच.डी. पूर्ण केली. त्यासाठी त्याला बारमध्ये वेटरचे काम करावे लागले. त्याचवेळी साहित्याची गोडी लागली. दोन कवितासंग्रहही लिहिले. प्राध्यापकासाठी आवश्यक पात्रता मिळवूनही पूर्णवेळ नोकरी काही मिळाली नाही. तासिका तत्त्वावर दिवसा शिकवायचे आणि रात्री हॉटेलमध्ये काम करायचे. एक-दोन प्रसंगात तर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनाच हॉटेलमध्ये सर्व्हिस द्यावी लागली. तरीही त्यांनी कधी कामाची लाज बाळगली नाही.
रेशन दुकानदाराला धान्य मागितल्याने अपमानस्पद वागणूक देत हाकलून दिले. त्यामुळे निराश झालेले रावळकर आत्महत्या करण्याची पोस्ट सोशल मीडियात टाकून निघून गेले होते. तेव्हा त्यांचे मित्र पी. विठ्ठल, कैलास अंभुरे यांच्यासह इतरांनी मनपरिवर्तन केले. यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदत मिळाली. यातून त्यांना जगण्याची उमेद मिळाली. वेटरचे काम करताना आलेल्या अनुभवांवर आधारित ३३२ पानांची ‘टिश्यू पेपर’ ही कादंबरी लिहिली.
बारबाला, वेटरच्या वास्तव जीवनाचे केले चित्रण
‘टिश्यू पेपर’ या कादंबरीत शिक्षणासाठी शहरात आलेल्या एका युवकाचे चित्रण आहे. हा युवक बारमध्ये वेटरचे काम करतो. तिथे असलेले इतर वेटर, बारबाला, हेल्पर, मोरीवाली बाई, वस्ताद, कॅप्टन आदींच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला आहे. बारबालांची तस्करी कशी केली जाते, याचे वास्तवही यातून मांडण्यात आलेले आहे.