Lok Sabha Election 2019 : खैरेंच्या कामगिरीवर तरुणांचे प्रश्नचिन्ह; ‘युवांचा आदित्य’ कार्यक्रमात प्रश्नांचा भडीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:00 AM2019-04-03T00:00:43+5:302019-04-03T11:58:55+5:30

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर ‘युवांचा आदित्य’ या संवाद कार्यक्रमात प्रश्नांचा भडीमार

Young people's question marks on Khairn's performance | Lok Sabha Election 2019 : खैरेंच्या कामगिरीवर तरुणांचे प्रश्नचिन्ह; ‘युवांचा आदित्य’ कार्यक्रमात प्रश्नांचा भडीमार

Lok Sabha Election 2019 : खैरेंच्या कामगिरीवर तरुणांचे प्रश्नचिन्ह; ‘युवांचा आदित्य’ कार्यक्रमात प्रश्नांचा भडीमार

googlenewsNext
ठळक मुद्देखासदारांनी २० वर्षांत काय केले‘युवांचा आदित्य’ संवाद कार्यक्रमात तरुण मतदारांच्या प्रश्नांवर ठाकरेंची उत्तरे

औरंगाबाद : शिवसेनेचे खासदार तथा महायुतीचे लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना २० वर्षांपासून आम्ही निवडून देतोय. तेच प्रश्न आजही कायम आहेत. आता त्यांना का निवडून द्यावे, कचरा प्रश्नावरून दंगल झाली, येथील सामाजिक सलोखा संपला. जालना रोडसारख्या महत्त्वाच्या रस्त्याचे काम करता आले नाही. नाशिकच्या तुलनेत औरंगाबाद मागे पडलेले आहे. औरंगाबादचा विकास त्या धर्तीवर का झाला नाही, या व इतर अनेक प्रश्नांचा भडिमार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर ‘युवांचा आदित्य’ या संवाद कार्यक्रमात मंगळवारी करण्यात आला. ठाकरे यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तितक्याच अभ्यासपूर्ण आणि लडिवाळ शैलीत देऊन प्रत्येकाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

खैरे यांनी २० वर्षांत शहरासाठी काय केले, या प्रश्नाचे उत्तर देताना आदित्य म्हणाले, शहर एका माणसामुळे मागे-पुढे जात नाही. खासदार दिल्लीत असतात. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाने स्मार्ट सिटीतून त्यांनी निधी आणला. १०० बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरू केली. ४०० मेट्रिक टन कचरा येथे निर्माण होतो. मुंबईतही कचरा समस्या होती. कचऱ्याचा प्रश्न सर्वांचा असून, वर्गीकरण करणे गरजेचे आहे. येथील मनपाचे बजेट कमी आहे. जीएसटी लागल्यामुळे शासनाकडे वर्षानुवर्ष अनुदानासाठी वाट पाहावी लागते आहे. कचऱ्याचे ४ प्रकल्प सुरू केले आहेत, तीन महिन्यांत कच-याचा निचरा होईल. १२० कोटी रस्त्यांसाठी आणले, लॉ विद्यापीठ, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, भूमिगत गटार योजनेंतर्गत एसटीपीची कामे झाली आहेत.

सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या प्रांगणावर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तरु ण मतदार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी ठाकरे यांनी तासभर संवाद साधला. शिक्षण, महिला सुरक्षा, राजकारण, पर्यटन, क्रीडा, वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण, महाविद्यालयीन निवडणुकांबाबत तरुण मतदार, विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. मुंबईसह जगभरातील बदल, शिक्षणातील नवीन प्रवाहाची उदाहरणे ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
तरुण मतदारांच्या मनातील प्रश्न

विद्या कोठावळेने महिला सुरक्षेबाबत प्रश्न केला. दिनेश वंजारे याने शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांच्या उदरनिर्वाहासाठी उपाययोजनांची मागणी केली. प्रशांत मोहोळ याने प्लास्टिक बंदीबाबत प्रश्न केला. वैष्णवी पाठक हिने अभियांत्रिकी अभ्यासक्रम मराठीत असावेत, अशी मागणी केली. प्रतीक्षा थोरात हिने औरंगाबाद पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या स्तरावर पोहोचावे, यासाठी काय प्रयत्न करणार, असे विचारले. सिद्धी कटारिया हिने शिवसेना व इतर पक्षांत काय फरक आहे, यावर प्रश्न केला. अक्षय खेडकर याने राजकारणात तरुणांना संधी मिळते का? याबाबत ठाकरे यांना विचारले. गुंजन शर्मा याने निवडणूक लढण्याबाबत प्रश्न केला. सायली घोडके हिने वैद्यकीय तर प्रवीण पाटील याने अभियांत्रिकी शिक्षणावर प्रश्न केला. चंचल अहिरे, हेमंत खांडकुळे, समृद्धी, रेणू या विद्यार्थ्यांनी तरुणांना वाव मिळत नसल्यामुळे होणारी घुसमट मांडली.

सर्व प्रश्न सुटले की लग्न करणार
सर्व प्रश्न सुटले की, लग्न करणार असल्याचे आदित्य यांनी एका प्रश्नांती सांगितले. तसेच अठरा वर्षांचे होताच मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. निवडणूक लढण्याची परवानगीदेखील याच वयात मिळावी. यासाठी केंद्र शासनाकडे मुद्दा उपस्थित केल्याचे ते म्हणाले. सगळे प्रश्न एका काचेच्या बाऊलमध्ये चिठ्ठीच्या स्वरूपात ठेवले होते. गर्दीतून एकाला बोलवून चिठ्ठी काढून प्रश्न विचारले गेले. सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.

भविष्यात निवडणुकीच्या मैदानात येणार
लोकसभा निवडणूक लढणार काय? या प्रश्नाचे उत्तर देताना ठाकरे म्हणाले, मला निवडणूक लढवायला आवडेल. भविष्यात मला तुम्ही निवडणुकीच्या मैदानात पाहाल. सध्या दुष्काळी भाग पाहतो आहे. लोकांचे प्रश्न सोडविले तर पक्ष तुमच्या मागे येतील. प्रत्येकाने राजकारणापेक्षा इतर क्षेत्रातही गेले पाहिजे. वचननाम्यात जे बोललो ते करून दाखवितो. मी वचन दिले तर मागे हटू श्कत नाही. समवयस्कांचे मी नेहमीच ऐकतो.

Web Title: Young people's question marks on Khairn's performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.