युवा सचिन लव्हेराच्या खेळीने महावितरणची मुंबईच्या संघावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 01:10 AM2017-12-10T01:10:39+5:302017-12-10T01:11:06+5:30
एमजीएम ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत यंग इलेव्हन अ, महावितरण आणि कन्नड सुपर किंग संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. आज झालेल्या सामन्यात युवा फलंदाज सचिन लव्हेरा याची झुंजार खेळी वैशिष्ट्य ठरले.
औरंगाबाद : एमजीएम ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत यंग इलेव्हन अ, महावितरण आणि कन्नड सुपर किंग संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. आज झालेल्या सामन्यात युवा फलंदाज सचिन लव्हेरा याची झुंजार खेळी वैशिष्ट्य ठरले.
सकाळच्या सत्रात झालेल्या लढतीत एमजीएम संघाविरुद्ध यंग इलेव्हन अ संघाने २0 षटकांत ४ बाद १४४ धावा केल्या. त्यांच्याकडून निरज शिमरेने ३0 चेंडूंत ४४ धावा केल्या. राहुल शर्माने ४२ व अजय काळे याने २९ धावा केल्या. एमजीएमकडून रहीम खानने २, तर अनंत बकाल व प्रसाद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात एमजीएम संघ २0 षटकांत ६ बाद १२८ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून अंकित चोनकर याने २ षटकार व ४ चौकारांसह ३८ चेंडूंत ५३ धावा केल्या. दुपारच्या सत्रात महावितरण संघाने ईएससीए मुंबई संघावर ५ गडी राखून मात केली. युवा फलंदाज सचिन लव्हेरा याच्या ८ चौकारांसह नाबाद ५१ धावांच्या बळावर महावितरण संघाने ११९ धावांचे लक्ष्य ५ गडी गमावून गाठले. पवन सूर्यवंशी व सतीश भुजंगे यांनी प्रत्येकी १४ धावा केल्या. त्याआधी मुंबईने २0 षटकांत ८ बाद ११८ धावा केल्या. त्यांच्याकडून दीपक नेरवालने ३५ व वैभव कळमकरने २५ धावा केल्या. महावितरण संघाकडून शाहीद सिद्दीकी व भास्कर जिवरग यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.