बजाजनगरमध्ये तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 09:04 PM2019-03-01T21:04:43+5:302019-03-01T21:04:58+5:30
२५ वर्षीय तरुणाने भावाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी बजाजनगरात घडली.
वाळूज महानगर : २५ वर्षीय तरुणाने भावाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी बजाजनगरात घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
पवन जंजाळ हा काही दिवसांपूर्वी वाळूज एमआयडीसीत रोजगाराच्या शोधात आला होता. बजाजनगरात पवनचा भाऊ गणेश जंजाळ व इतर नातेवाईक वास्तव्यास आहे. पवन हा वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. दरम्यान, गणेशने गुरुवारी पवनला मला रात्रीच्या शिफ्टमध्ये कामावर जायचे असल्यामुळे घराचे संरक्षण करण्यासाठी तु माझ्यात घरी थांब असे सांगितले. त्यामुळे पवन गणेशच्या घरी झोपी गेला. शुक्रवारी सकाळी गणेश कंपनीतून घरी आल्यानंतर त्याने घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून कुठलाही प्रतिसाद येत नसल्यामुळे त्याने नातेवाईक व एमआयडीसी वाळूज पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता पवन हा दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.