तुमचे वीजबिल अपडेट झाले नाही? असे म्हणत सायबर भामट्यांचा प्राचार्याला फसविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 03:04 PM2022-07-25T15:04:11+5:302022-07-25T15:05:14+5:30
९० हजार गेल्यानंतर डाऊनलोड ॲप केले डिलिट, त्यानंतर
औरंगाबाद : सध्या सायबर भामट्यांनी सगळीकडेच उच्छाद मांडला आहे. एसएमएस, व्हाॅटस्ॲप मेसेजद्वारे बनावट संदेश पाठविण्यात येत आहेत. त्यात वीजबिल भरले नाही, केवायसी अपडेट करा, तुम्हाला बक्षीस लागल्याचे सांगितले जाते. असाच प्रकार विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश सुराणा यांच्यासोबत रविवारी घडला. त्यांना तब्बल ९० हजार रुपयांना फसविण्यात आले. मात्र, त्यांनी समयसूचकता दाखवत डाऊनलोड केलेले ॲपच डिलिट केले. त्यामुळे त्यांचे पैसे पुन्हा क्रेडिट झाले आहेत.
प्राचार्य डॉ. सुराणा यांना ‘तुमचे मागील महिन्याचे वीजबिल अपडेट केलेले नाही. त्यामुळे संध्याकाळी साडेनऊ वाजता आपला वीज पुरवठा बंद करण्यात येईल. त्यामुळे खाली दिलेल्या अधिकाऱ्यांच्या नंबरवर तत्काळ संपर्क साधा’, असा संदेश आला. सुराणा यांनी वीजबील पेटीएमसोबत जोडलेले असल्यामुळे बिल येताच भरले जाते. त्यामुळे त्यांनी मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवर फोन केला. तेव्हा समोरुन सांगितले गेले की, आपण बिल भरले असले तरी अपडेट झालेले नाही. त्यामुळे अपडेट करण्यासाठी ‘आरक्युब’ नावाचे ॲप डाऊनलोड करा. तसेच भामट्याने फोन कट होऊ न देता संपूर्ण प्रक्रिया करून घेतली. ‘आरक्युब’ ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर वीजबिल अपडेट करण्यासाठी दहा रुपये पेटीएमद्वारे पाठविण्यास सांगितले. हे पैसे पाठवताच त्यानंतर दोन ते तीन मिनिटात ५५, १५ आणि २० हजार रुपये बँक खात्यातून डेबिट झाले. हे पैसे गेल्याचे मेसेज आले. त्याचवेळी पेटीएमनेही ‘आरक्युब’ नावाचे ॲप फ्रॉड असल्याचा संदेश पाठवला. डॉ. सुराणा यांना आपण फसलो गेल्याचे समजले. त्यांनी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला चांगलीच शिवीगाळ करत तत्काळ ॲप अनइन्स्टाॅल केले. त्यानंतर काही वेळातच त्याचे गेलेले ९० हजार १० रुपये परत बँक खात्यात जमा झाले. तसेच त्यांनी बँक खात्यात असलेले सर्व पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात पाठवून बाजू सुरक्षित करून घेतली.
कोणालाही उत्तर देऊ नका
सध्या सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज पाठवून फसवणूक करत आहेत. हे आरोपी राज्याबाहेरील आहेत. त्यामुळे अनोळखी मेसेजला उत्तर देऊ नका, ॲप डाऊनलोड करू नका, सोशल मीडियात चॅटिंगही करू नका. यानंतरही फसवणूक झालीच तर साबयर पोलिसांशी संपर्क साधा.
- गौतम पातारे, निरीक्षक, सायबर शाखा