तुझ्या पाऊलखुणा...औरंगाबादमध्ये बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन भूमीचा वारसा जपला जातोय
By सुमेध उघडे | Published: December 6, 2018 02:21 PM2018-12-06T14:21:54+5:302018-12-06T14:22:45+5:30
बाबासाहेबांच्या पाऊलखुणा असलेल्या घरांना त्या स्थितीत कायम ठेवून विकसित न करण्याचा निर्णय जागामालकांनी घेतला आहे.
- सुमेध उघडे
औरंगाबाद : आज मराठवाडा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटले की, नागसेनवन ही त्यांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी समोर येते. बाबासाहेबांचा अनुयायी या भागात आला तर येथील मातीला नमन केल्याशिवाय राहत नाही. मात्र औरंगाबादमध्ये नागसेनवन हीच एकमेव जागा नाही जिथे बाबासाहेबांचे पाय लागले. शहरातील भीमपुरा (उस्मानपुरा परिसर), पैठणगेट आणि छावणी या वसाहतीतसुद्धा बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण, काळ व्यतीत केला आहे. ही ठिकाणे आता एक ऐतिहासिक वारसा झाली आहेत. विशेष म्हणजे काळाच्या ओघात संपूर्ण शहर बदलत असताना पैठणगेट आणि छावणी येथील बाबासाहेबांच्या पाऊलखुणा असलेल्या घरांना त्या स्थितीत कायम ठेवून विकसित न करण्याचा निर्णय जागामालकांनी घेतला आहे. तर भीमपुरा येथील छोट्याशा विहाराचे आज भव्य विहारात रुपांतर झाले आहे.
मराठवाड्यातील पहिली सभा भीमपुऱ्यात
१५ आॅक्टोबर १९३३ साली सायंकाळी बाबासाहेबांचे काही प्रमुख कार्यकर्त्यांसह नाशिकहून औरंगाबादला आगमन झाले. बाबासाहेब प्रथमच मराठवाड्यात येत असल्याने ‘पश्तोकौम (मागासवर्गीय) मंडळ’ चे पदाधिकारी दादाराव काळे, मोहनराव जोगदंडे, पोचम्मा मुत्याल आणि संभाजी वाघमारे आदींनी तत्कालीन निजामाचे जहांगीरदार मनसुरेयार जंग यांच्या उस्मानपुरा येथील देवडीमध्ये त्यांची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी तत्कालीन बारा पत्थर (भीमपुरा) येथे त्यांच्या स्वागतासाठी अनुयायांनी कच्चा रस्ता तयार करून दोन्ही बाजूने चुना लावलेले दगड रोवले, रस्त्याच्या दुतर्फा पताका लावल्या. तसेच तरुण सेवक हातात काठ्या घेऊन मानवंदनेसाठी उभे होते. एव्हाना बाबासाहेबांची एक झलक पाहण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी शहरातील बावन्नपुऱ्यातून अनुयायी मोठ्या संख्येने येथे दाखल झाले होते. बाबासाहेबांचे आगमन होताच सर्वांनी एकच जयजयकार केला. जुन्या चालीरीती सोडा, सर्वांनी शिक्षण घ्या, पुढच्या वेळेस येथे शाळा-कॉलेज सुरू करण्यासाठी येईल, असे भाषण यावेळी बाबासाहेबांनी केले. येथील पश्तोकौम मंडळाचे काही कार्यकर्ते ब्रिटिशांकडे बटलर म्हणून कामे करायची, त्यांनी बाबासाहेबांना पाश्चात्य पद्धतीचे जेवण दिले. यावर बाबासाहेबांनी ‘मी साधे जेवण घेतले असते, हा खर्च का केला’ असे म्हटले. कार्यकर्त्यांनी सर्व जेवण आम्हीच बनवले असून, आम्ही बटलर आहोत असे सांगताच बाबासाहेबांनी आनंद व्यक्त करीत त्यांच्याशी इंग्रजीत संवाद साधला. जेवणानंतर बाबासाहेब पुढच्या सभेसाठी रवाना झाले. यानंतर बारा पत्थर या जागेचे नामकरण भीमपुरा झाले.
पैठणगेटजवळील वस्तीवर मुक्काम
बारा पत्थर (भीमपुरा) येथून बाबासाहेब १६ आॅक्टोबर १९३३ च्या सायंकाळी औरंगाबाद शहरात प्रवेश करण्यासाठी पैठणगेटकडे आले. निजामाच्या सैनिकांनी त्यांना शहरात प्रवेश नाकारला. यामुळे बाबासाहेब पैठणगेटच्या तटबंदीला लागून असलेल्या मागासवर्गीयांच्या वस्तीत आले. त्यावेळी येथे जेमतेम दहा-बारा घरे असतील. येथील चावडीवर बाबासाहेबांनी कांबळे, उबाळे, कदम आणि साळवे या अनुयायांसोबत छोटी बैठक घेतली. यात निजामाकडून मागासवर्गीयांना दिली जाणारी वागणूक याबद्दल जाणून घेतले. यानंतर चावडीजवळच घर असलेले चुन्याचे व्यावसायिक काशीनाथ कांबळे यांच्याकडे बाबासाहेब आरामासाठी गेले. येथेच त्यांनी काशीनाथ यांच्या आई गोधन यांनी बनवलेली बाजरीची भाकरी, ठेचा, बोंबलाची चटणी असे जेवण घेतले. या दरम्यान, निजामास त्याच्या मुलाने बाबासाहेबांच्या आगमनाबद्दल माहिती दिली. बाबासाहेबांना राजशिष्टाचाराप्रमाणे शहरात प्रवेश द्यावा, असे आदेश यानंतर निजामाने सैनिकांना दिले. बाबासाहेब येथून गेले मात्र कांबळे कुटुंबांनी त्यांच्या पाऊलखुणा जपत त्यांचे घर अद्यापही तसेच ठेवले असून, याचे रुपांतर ‘गोधन विहार’ असे करण्यात आले आहे.
बंगला क्रमांक -९
बाबासाहेब त्यांच्या स्वप्नातील नागसेनवनाची निर्मिती करण्यासाठी जातीने लक्ष देत असत. या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची उभारणी होताना ते स्वत: सर्व कामात लक्ष घालत. या काळात छावणी परिसरातील बंगला क्रमांक - ९ मध्ये बाबासाहेब राहत. इमारत उभी राहण्यापूर्वी मिलिंद महाविद्यालय छावणीतील सरकारी जागेत तात्पुरत्या स्वरुपात सुरू होते. नागसेन परिसर, महाविद्यालय व खानावळीच्या तात्पुरत्या इमारती याच भागात असल्याने बंगला क्रमांक- ९ हा तेव्हा केंद्रबिंदू होता. आज याठिकाणी लष्कराच्या संबंधित नागरिकांचे वास्तव्य आहे.
बाबासाहेबांचे एकनिष्ठ सेवक : शिवराम जाधव
नागसेनवन परिसरात बाबासाहेबांनी शाळा-महाविद्यालय उभारण्याचे काम सुरू केले होते. त्यामुळे बाबासाहेबांनी छावणी भागातील लष्कराच्या ताब्यात असलेल्या काही इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात महाविद्यालय सुरू केले. दरम्यान, बाबासाहेबांचा मुक्कामसुद्धा याच भागात असल्याने त्यांच्या हाताखाली प्राचार्य म. भि. चिटणीस यांनी महाविद्यालयाची खानावळ चालवणाऱ्याचा भाचा शिवराम जाधव या तरुणाची नियुक्ती केली. १८ मार्च १९५३ रोजी शिवराम जाधव बाबासाहेबांच्या सेवेत रुजू झाले. जाधव हे बाबासाहेबांच्या घरी त्यांची खोली, लिखाणाचे साहित्य, ग्रंथ आणि इतर वस्तू यांची व्यवस्था पाहत. सध्या छावणी बाजार रस्त्याजवळ जाधव यांचे घर आहे. बाबासाहेब महाविद्यालयाच्या बांधकामानिमित्त या भागात अनेकदा येत. त्यांच्या घरी काही काळ आराम करीत. येथे बाबासाहेबांचा टेबल असून, त्यांनी यावर जेवण केल्याची आठवणसुद्धा जाधव सांगतात. बाबासाहेब समाजात परिवर्तन करण्यासाठी अत्यंत तळमळीने कार्य करीत. जाधव याबाबत सांगतात, एकदा बाबासाहेबांचे रात्रीचे जेवण झाले आणि ते हात धुण्यासाठी बाजूला गेले.
दरम्यान, माईसाहेबांनी मला प्लेट उचलण्यास सांगितले. प्लेटमध्ये बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी होती. मला ते अन्न टाकून देणे चांगले वाटले नाही म्हणून मी त्याचा एक घास तोंडात टाकला. इतक्यात बाबासाहेबांनी ते पाहत रागाच्या भरात माझ्या कानाखाली दिली. दोन दिवस मी कामाला गेलो नाही तर त्यांनी वडिलांसह मला बोलावून घेतले. मी कशासाठी धडपड करतोय, दुसऱ्याचे उष्टे अन्न खाणे, जुन्या चालीरीती कायमच्या नष्ट करणे, त्या बंद करणे यासाठीच ना, यामुळेच शिवराममध्ये हे परिवर्तन रुजण्यासाठी त्याला चापट मारली. यासह बाबासाहेबांच्या निधनाची माहिती प्राचार्य चिटणीस यांना देण्याची जबाबदारी माईसाहेबांनी फोन करून मला दिली होती, हे सांगताना जाधव यांचे डोळे पाणावले होते. आज जाधव शरीराने थकले असून, त्यांनी अजूनही बाबासाहेब बसत असत ती खोली जतन करून ठेवली आहे.
२६, अलीपूर रोड, नवी दिल्ली
दिल्लीत असताना तीन ते चार बंगल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य राहिले. यातील २६, अलीपूर रोड या बंगल्यात त्यांचे सर्वात जास्त काळ वास्तव्य होते. माहितीनुसार बाबासाहेब या बंगल्यात १ नोव्हेंबर १९५१ साली राहायला आले. हा बंगला अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याआधी याच बंगल्यात श्रीलंकेच्या भिक्खू संघाची आणि त्यांची भेट झाली. १४ आॅक्टोबर १९५६ साली धर्मांतर केल्यानंतर बाबासाहेब नागपूरवरूनच काठमांडूला गेले. परतीच्या प्रवासात ते सारनाथ, सांची व गया येथे गेले. या ठिकाणच्या कार्यक्रमात व्याख्याने आणि प्रवास यामुळे बाबासाहेबांची प्रकृती खालावली व ते दिल्लीला परतले. यानंतर प्रकृती बिघडत जात त्यांनी अखेरचा श्वास याच बंगल्यात घेतला. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर काही काळ माईसाहेब याठिकाणी राहिल्या. आज या बंगल्याचे रुपांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकात करण्यात आले आहे. बाबासाहेब प्रकांड पंडित असल्याने या स्मारकाला पुस्तकाचा आकार देण्यात आला आहे. यात त्यांचे जीवन आणि राष्ट्राप्रती योगदान याची झलक दिसते.