महापौरसाहेब, तुमच्या कारभाराचा फटका चंद्रकांत खैरेंना बसला : हरिभाऊ बागडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 08:03 PM2019-08-29T20:03:33+5:302019-08-29T20:05:38+5:30
कारभार सुधारण्याचा दिला घोडेलेंना सल्ला
औरंगाबाद : महापौर सकाळपासून संध्याकाळपर्यंत शहरात कितीतरी चकरा मारतात. चांगले काम करतात; परंतु लोक अजूनही तुमच्या कारभाराविषयी नाराज आहेत. त्याचा फटका माझे मित्र चंद्रकांत खैरे यांना बसला आहे. त्याचे दु:ख अजूनही आहे. त्यामुळे पुढच्या काळात ही परिस्थिती सुधारली पाहिजे, असा सल्ला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिला.
सिडको बसस्थानकात उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टचे बुधवारी (दि. २८) भूमिपूजन झाले. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना हरिभाऊ बागडे बोलत होते. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची खंत हरिभाऊ बागडे यांनी बसपोर्टच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केली. महापौरांनी पुढच्या काळात परिस्थिती सुधारली पाहिजे. त्यासाठी लागेल ती मदत सरकारकडून मागावी. ती मदत द्यायला सरकार तयार आहे. केवळ परिस्थिती सुधारावी, अशी अपेक्षा हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली.
‘रस्ता तेथे एसटी’ असे म्हटले जाते; परंतु रस्ते खूप झाले आहेत; परंतु अनेक ठिकाणी एसटी जात नाही. किमान दिवसभरातून एकदा तरी तेथील लोकांसाठी बस गेली पाहिजे, असेही हरिभाऊ बागडे म्हणाले.
सगळ्या बस सुधाराव्यात
एसटी महामंडळाच्या ताफ्यात शिवशाही बस आली; परंतु सगळ्याच बसगाड्या तशा नाहीत. त्यामुळे यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, असेही हरिभाऊ बागडे म्हणाले.
प्रक्रिया अंतिम स्वरूपात
मध्यवर्ती बसस्थानक, बसपोर्टच्या निविदा काढल्या. याला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. लवकरच काम सुरूहोईल, असे एसटी महामंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक (स्थापत्य) राजेंद्र जवंजाळ म्हणाले.