आपल्या वाहनावर दंड तर नाही ना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:02 AM2021-09-26T04:02:11+5:302021-09-26T04:02:11+5:30
ई-चालानची माहिती मिळेना : मोबाइल नंबर नमूद नसणे, चुकीचा नंबर टाकण्याचा परिणाम औरंगाबाद : वाहतूक नियमांचा भंग केला, तर ...
ई-चालानची माहिती मिळेना : मोबाइल नंबर नमूद नसणे, चुकीचा नंबर टाकण्याचा परिणाम
औरंगाबाद : वाहतूक नियमांचा भंग केला, तर आता वाहतूक पोलिसांकडून ई-चालान देण्यात येते. वाहनाची नोंदणी करताना आपला मोबाइल नंबर नमूद करणे गरजेचे असते; परंतु वाहन नोंदणीच्या वेळी रकान्यात मोबाइल नंबर नमूद न करणे, नंतर मोबाइल नंबर बदलणे, अशा कारणांनी ई-चालानची माहितीच वाहनचालकांपर्यंत पोहोचतच नाही. त्यातून दंडाची थकबाकीही वाढत जाते. मग, जेव्हा वाहतूक पोलीस पकडतात आणि जुन्या ई-चालानचे आकडे सांगतात, तेव्हा दंडाची रक्कम ऐकून धक्का बसण्याची वेळ वाहनचालकांवर येऊ शकते. त्यामुळे आपल्या वाहनावर दंड तर नाही ना, याची वाहनचालकांनी वेळीच खातरजमा करुन घेतलेली बरी.
------
१७ हजार वाहनधारकांनी थकविला दंड
ई-चालान दिल्यानंतर शहरात तब्बल १७ हजार २६१ वाहनधारकांनी दंड थकविला. यात गेल्या दोन दिवसात ३ हजार ९७३ वाहनचालकांकडून तडजोड करून २९ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. ई-चालान दिले, मात्र त्याची माहितीच वाहनचालकांपर्यंत पोहोचली नसल्याने दंड भरला जात नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आता स्वत:च्या वाहनावर दंड आहे की नाही, हे पाहण्याची वेळ ओढावत आहे.
--
वाहनावर दंड आहे का, या ॲपवर शोधा
मोबाइलमध्ये महा ट्रॅफिक ॲप डाऊनलोड करून आपल्या वाहनावर एखादा दंड आहे का, हे पाहणे अगदी सोपे आहे. या ॲपमध्ये वाहनासंबंधी आवश्यक ती माहिती भरल्यानंतर ई-चालानची माहिती मिळू शकते. वाहनाला दंड लागलेला असेल, तर तो भरण्याची सुविधाही ॲपमध्ये देण्यात आलेली आहे.
------
प्रलंबित दंड भरावा
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाचे ई-चालान निर्माण होते. हे ई-चालान कोणत्याही वाहतूक सिग्नलवर कार्यरत वाहतूक पोलीस अंमलदाराकडे तसेच महा ट्रॅफिक ॲपद्वारे आणि वाहतूक शाखेच्या कार्यालयात भरता येते. वाहनावर दंडाची रक्कम प्रलंबित असल्याचे कळताच वाहनधारकांनी तातडीने स्वत:हून ई-चालानचा भरणा करावा.
- मुकुंद देशमुख, वाहतूक निरीक्षक