मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून युवकाने मागितला न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 07:06 PM2020-01-09T19:06:51+5:302020-01-09T19:15:04+5:30
भूसंपादन प्रक्रियेनुसार कारवाई करण्याची मागणी
औरंगाबाद : जयभवानीनगर येथील गणेश सूर्यवंशी या युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रक्ताने पत्र लिहून न्याय मागितला आहे. गल्ली नं.१५ मध्ये राहणाऱ्या सूर्यवंशीने ई-मेलद्वारे रक्ताने लिहिलेल्या पत्राची प्रत स्कॅन करून पाठविली आहे. त्यात त्याने म्हटले आहे. गरिबांना न्याय मिळाला पाहिजे. गरिबांना कधी न्याय मिळणार, राजकारणी लोक किड्या-मुंग्यांप्रमाणे पायाखाली सामान्य नागरिकांना चिरडत आहेत. यासाठी मुख्यमंत्री काय करणार, याचे उत्तर मिळाले पाहिजे.
शिवाजीनगर ते रामनगरपर्यंत होणाऱ्या रस्तारुंदीकरण मोहिमेत २०० हून अधिक घरे जात आहेत. महापालिका यासाठी भूसंपादन करीत असल्याचे सूर्यवंशी याचे म्हणणे आहे. मागील दोन दशकांपासून नागरिक या परिसरात राहत आहेत. त्यांनी बॉण्डवर प्लॉट खरेदी केले आहेत.
नागरिकांना कोणतीही सूचना न देता महापालिकेने रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. रस्ता रुंदीकरण करण्यासाठी नागरिकांचा कोणताही विरोध नाही; परंतु पालिकेने भूसंपादन प्रक्रियेनुसार कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांसह महापालिका आयुक्तांनादेखील सूर्यवंशी याने पत्र पाठविले आहे. दरम्यान, सूर्यवंशी याच्याशी संपर्क केला असता तो म्हणाला, मी खरच रक्ताने पत्र लिहून त्याचे स्कॅन करून मुख्यमंत्र्यांना ई-मेल केले आहे. सामान्यांचा आवाज महापालिका ऐकत नाही, त्यामुळे या मार्गाने जावे लागले.