औरंगाबादच्या युवकाचा कागजीपुरा येथील तलावात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 12:42 PM2019-03-22T12:42:54+5:302019-03-22T12:44:50+5:30
तलावातील पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह झाला.
खुलताबाद ( औरंगाबाद ) : मित्रांसोबत फिरण्यासाठी कागजीपुरा येथे गेलेल्या औरंगाबाद येथील एका युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि. २१ ) दुपारी घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद येथील अल्तमश कॉलनी येथील नसीम खान मोबीनखान, शेख अरबान शेख शब्बीर व मुस्तखीमखान मजहरखान हे तिघे मित्र कागजीपुरा येथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी औरंगाबाद - धुळे महामार्गावर असलेल्या एका तलावातील पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह झाला. नसीमखान मोबीनखान व शेख अरबान शेख शब्बीर हे दोघे तलावात उतरले. मात्र नसीमखान यास पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावातील खड्ड्यात बुडाला.
शेख अरबान शेख शब्बीर व मुस्तखीमखान मजहरखान यांनी लागलीच मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून काही नागरिक तेथे आले. शेख आरीफ अब्दूल गफूर यांनी लागलीच पाण्यात उडी नसीमखान मोबीनखान यास बाहेर काढले. तपासणी अंती तो मृत झाल्याचे निदर्शनास आले. कागजीपुरा येथील तलावातील गाळ- माती काढण्यात आल्याने तलावात मोठ मोठी खड्डे पडले असल्याने हा तलाव धोकादायक आहे. घटनास्थळी पोहेकॉ संजय जगताप, प्रकाश मोहीते, शिंदे यांनी पंचनामा केला असून खुलताबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बचाव कार्यात कागजीपुरा चे सरपंच शेख अहेमद, पोलीस पाटील मोहम्मद ईरफान ग्रा .पं. सदस्य महंमद रिजवान, अब्दुल आरीफ अब्दुल गफुर यांचा सहभाग होता.