कन्नड येथे सापडलेले 'ते' प्रेत चाळीसगावच्या युवकाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 07:37 PM2018-05-04T19:37:20+5:302018-05-04T19:38:36+5:30
औरंगाबाद रस्त्यावरील कमानी नाल्याजवळील विहीरीत गुरुवारी सायंकाळी अद्यात व्यक्तीचे प्रेत आढळून आले होते.
कन्नड ( औरंगाबाद ) : औरंगाबाद रस्त्यावरील कमानी नाल्याजवळील विहीरीत गुरुवारी सायंकाळी अद्यात व्यक्तीचे प्रेत आढळून आले होते. पोलिसांच्या तपासांती आज या मृताची ओळख पटली आहे. महेंद्र उत्तम केदार असे मृताचे नाव असून तो धस्केबर्डी ता. चाळीसगाव येथील रहिवासी होता.
गुरुवारी सायंकाळी कमानी नाल्याजवळील गट नं.१६७/१ मधील विहीरीत प्रेत असल्याची खबर शहर पोलीस ठाण्यास मिळाली. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, उपनिरीक्षक सतिष दिंडे यांनी घटनास्थळी धव घेतली. प्रेताची तपासणी केली असता त्यांना एक मोबाईल आढळून आला. पोलिसांनी याद्वारे तपासाला गती देत मृताची ओळख पटविण्यात यश मिळवले. महेंद्र केदार असे मृताचे नाव असून त्याच्या पत्नीसह नातेवाईकांनी ओळख पटवली. महेंद्र २ तारखेपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने मेहुणबारा पोलीसस्थानकात दिली होती.
गळा आवळून केली हत्या
उत्तरीय तपासणीत केदार यांचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग हे करत आहेत. दरम्यान, मयताची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती व तो बकऱ्या चारण्याचे काम करत असे अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.