उच्च शिक्षणासाठी पैसे नसल्याने युवकाने केली आत्महत्या
By Admin | Published: May 7, 2017 12:10 AM2017-05-07T00:10:36+5:302017-05-07T00:13:25+5:30
लोहारा : आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने नैराश्य आलेल्या एका २२ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली़
लोकमत न्यूज नेटवर्क
लोहारा : आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने नैराश्य आलेल्या एका २२ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे शनिवारी सकाळी घडली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील मनिष नवनाथ कांबळे (वय २२- वर्ष) हा युवक तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बी. एस्सी. च्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याला एमबीए करायची इच्छा होती. यासाठी त्याने दोन महिन्यांपूर्वी बंगळूर येथील महाविद्यालयात अर्ज केला होता़ मात्र, टक्केवारी कमी असल्याने एमबीएला प्रवेश घेण्यासाठी तीन ते चार लाख रुपये लागणार होते. एवढे पैसे आणायचे कुठून हा प्रश्न त्याच्या व कुटुंबाच्या समोर होता.
घरची तीन एकर शेती असून, या शेतीवर कर्ज काढून आपण पैसे भरु शकतो, अशी आशा असल्याने त्याने तुळजापूर येथील एका बँकेकडे शेतीसाठी कर्जाची मागणी केली होती़ मात्र, बँकेनेही कर्ज देण्यास टाळटाळ केली. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असून, आई-वडील, मोठा भाऊ मोलमजुरी करून मनिषच्या शिक्षणासाठी खर्च करीत होते. पुढील उच्च शिक्षणाचा आर्थिक खर्च आई-वडिलांना झेपणार नाही. त्यामुळे आपले शैक्षणिक स्वप्न पूर्ण होणार नसल्याच्या चिंतेने नैराश्य आलेल्या मनिष याने शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेबाबत लोहारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
पुढील तपास पोलीस हवालदार अशोक सांगवे करीत आहेत. मयत मनिष याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ व दोन विवाहित बहिणी असा परीवार आहे. उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागत असल्याने मनिषने केलेल्या आत्महत्येने हिप्परगा (रवा) गावावर शोककळा पसरली आहे़ दरम्यान, मनिष याच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.