स्वातंत्र्याची युवकांची संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:02 AM2021-08-15T04:02:01+5:302021-08-15T04:02:01+5:30
औरंगाबाद : स्वातंत्र्यात मुक्ती, हक्क, जबाबदारी या जाणिवांचा संगम होतो, तसेच स्वातंत्र्य म्हणजे, स्वतः निर्माण केलेली व्यवस्था, स्वतःचे तंत्र ...
औरंगाबाद : स्वातंत्र्यात मुक्ती, हक्क, जबाबदारी या जाणिवांचा संगम होतो, तसेच स्वातंत्र्य म्हणजे, स्वतः निर्माण केलेली व्यवस्था, स्वतःचे तंत्र आणि स्वतःचे बंधन. १५ ऑगस्ट १९४७ ला परकीय शक्तीच्या पारतंत्र्यातून मुक्त झाल्यापासून भारतीयांसमोर अनेक आव्हाने आहेत. आज जगात सर्वांत जास्त युवा लोकसंख्या भारतात आहे. त्यांना भ्रष्टाचार, गरिबीपासून मुक्ती, मोफत शिक्षण आणि आरोग्यसेवा, शेतकरी-मजुरांच्या कष्टाला किंमत, अर्थ- विज्ञान- तंत्रज्ञानात प्रगती, अभिव्यक्ती हे ज्वलंत विषय ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेशी निगडित वाटतात.
...........................
मानसिक गुलामगिरी संपावी
सामान्य माणसाला स्वातंत्र्य हवे आहे निखळ स्वच्छंदी जगण्याचे. राज्यघटनेने दिलेले अधिकार वापरण्याची सद्बुद्धी ठरावीक जणांकडेच आहे. आज भारत बहुप्रमाणात मानसिक गुलामगिरीत पिचलेला आहे. राजकीय नेते, बुवाबाबा यांची हांजीहांजी करण्यापुरते अनेकांचे स्वातंत्र्य सीमित झालेय. आज कुणीही कुणाची चिकित्सा करत नाही. सगळेच ‘हो’ला ‘हो’ लावतात. यातून स्वतंत्र होणे आजघडीला महत्त्वाचे आहे. प्रत्येक जण आपल्या सोईनुसार स्वातंत्र्याची व्याख्या करत आहे; परंतु जातीअंत, राजकीय, आर्थिक आणि स्त्री-पुरुष समानता यातून मिळालेले सामाजिक स्वातंत्र्य आज देशाला महासत्ता बनवेल.
- श्रद्धा खरात, संशोधिका
........
‘ब्राइट फ्युचर’साठी शिस्त हवीच
स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेकांचे तारुण्य स्वैराचारात जात आहे. यामुळे घरातील ज्येष्ठांनी लावलेली शिस्त आणि बंधने असायलाच हवीत, नसता आजचे स्वातंत्र्य उद्या महागात पडू शकते. बेबंद आयुष्याला लगाम द्यावा लागतो, लगाम ओढणारे कोणीच नसेल, तर आयुष्यच उधळले जाईल. स्वातंत्र्यासोबत मिळालेल्या हक्कांसोबत सर्वांनी जबाबदारीचेही पालन करावे. यातच मला ब्राइट फ्युचर दिसते.
-धनश्री भोसले, विद्यार्थिनी
...............................
‘डीपी’ नको विचार बदलावे
स्वातंत्र्य दिन आला की, सोशल मीडियावर देशभक्तीचा पूर येतो. डिस्प्ले पिक्चर बदल, स्टेटस ठेव, मोठ्याने गाणी लाव, असे दिवसभर चालते. मात्र, वर्षभर एक जबाबदार नागरिक म्हणून वागणे हे खरे स्वातंत्र्य आहे. सार्वजनिक स्वच्छता पाळणे, नियमित कर भरणे, स्वदेशीचा वापर वाढवणे आणि मतदानाचा हक्क बजावणे यातून खऱ्या अर्थाने देशभक्ती दिसून येईल.
-अपूर्वा कुलकर्णी, संशोधिका
................
सामाजिक पारतंत्र्यातून मुक्त करा
स्वातंत्र्य मिळाले. मात्र, आजही देश सामाजिक पारतंत्र्यात आहे. समतेसाठी आजही झगडावे लागते. मागासवर्गीयांवर अत्याचार, शेतकरी आत्महत्या रोखण्यात ७४ वर्षांतही अपयश आले आहे. देशातील गरीब-श्रीमंत, उच्चवर्णीय-कनिष्ठवर्णीय, व्यापारी-शेतकरी, उद्योगपती ते कामगार यांच्यातील दरी जेव्हा कायमची मिटेल तेव्हा खऱ्या अर्थाने बलसागर भारत होईल. महात्मा गांधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पूजन नको, अंमलबजावणी व्हावी.
-संतोष अंभोरे, विद्यार्थी
...................
आपले मत बाळगण्याचे, ते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असावे. शासनाचे धोरण आपल्याला चुकीची वाटत असल्यास त्याविरोधात मत व्यक्त केल्यास भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्याप्रमाणे देशद्रोहाचे खटले स्वतंत्र भारतात तर दाखल व्हायला नकोत. मॉब लिंचिंग, ऑनर किलिंग वा इतर कुठलीही भीती नसावी. विशिष्ट समाजघटकांना अजूनही असमान वागणूक दिली जाते, हे बंद होऊन, आवडेल तशी वेशभूषा, खाणे, राहणे हे व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून स्वीकारले पाहिजे. हे सर्व सहजपणे करता येत असेल, तरच आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहोत, असे म्हणता येईल.
-मुकुल निकाळजे, अभ्यासक