इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:56 AM2017-09-23T00:56:11+5:302017-09-23T00:56:11+5:30

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने जनजागृती मोहीम हाती घेतली असून, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पेट्रोलपंपांवर व कॉलेज टू कॉलेज जाऊन पत्रके वाटणार आहेत

 Youth Congress campaign against fuel hike | इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची मोहीम

इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची मोहीम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने जनजागृती मोहीम हाती घेतली असून, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पेट्रोलपंपांवर व कॉलेज टू कॉलेज जाऊन पत्रके वाटणार आहेत. ही मोहीम आजपासून औरंगाबादेत व हळूहळू महाराष्टÑभर राबविण्यात येणार असल्याची माहिती आज येथे एका पत्रपरिषदेत प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, इंधन दरवाढीमुळे जनतेत प्रचंड असंतोष खदखदतोय. यासाठी आता युवक काँग्रेस आक्रमक कार्यक्रम हाती घेणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुमारे ५० हजार पत्रके एकट्या औरंगाबादेत वाटून मोठी जनजागृती करणार आहे.
२०१०-१३ या कालावधीत आंतरराष्टÑीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती १२० ते १५० डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचल्या होत्या. तत्कालीन काँग्रेस सरकारने जनतेच्या भल्याचा विचार करून पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घट होऊन ते दर ५५ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आले आहेत. असे असतानाही ८० रु. लिटर पेट्रोलचा दर आकारून सरकारने जनतेची लूट चालविली आहे. गेल्या दोन वर्षांत कच्च्या तेलाच्या दरात आंतरराष्टÑीय बाजारपेठेत फारसा फरक पडलेला नाही. तरीही पेट्रोलचा दर तब्बल २० रुपयांहून अधिक वाढला. विकासाच्या नावाखाली सुरू असलेली ही लूट आणखी किती काळ सहन करायची? असा सवाल तांबे यांनी उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, सरकारने आंतरराष्टÑीय दराप्रमाणे दररोज इंधन दर बदलत राहणार, अशी पद्धती स्वीकारली आणि त्याच्या नावाखाली अवघ्या ७२ दिवसांत पेट्रोलचे दर १६ रुपयांनी वाढवून टाकले. १ जुलै २०१७ रोजी ६३ रु. प्रतिलिटर असणारे पेट्रोल आज ८०-८१ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. डिझेलच्या बाबतीत असेच झाले आहे. नोटाबंदी व जीएसटीमध्ये आलेले अपयश लपविण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सुधारत नाही म्हणून सरकार जनतेकडून कराची तुघलकी वसुली करीत आहे.
आता दारूची दुकाने चालू झाली आहेत. त्यामुळे महाराष्टÑ सरकारने लावलेले उपकर तात्काळ मागे घेतले पाहिजे व पेट्रोलवर जीएसटी लावून दर तात्काळ कमी करण्यात आले पाहिजे, अशी आग्रही मागणी यावेळी तांबे यांनी केली.
पत्रपरिषदेस प्रदेश प्रतिनिधी जितेंद्र देहाडे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर मुठ्ठे पाटील, अकिल पटेल, मोईन इनामदार, खालेद पठाण, सलमान पटेल, आमेर अब्दुल सलीम, कमलेश कामिटे, सोनू पाईकडे, इम्रान पटेल, इद्रीस नवाज खान आदींची उपस्थिती होती.

Web Title:  Youth Congress campaign against fuel hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.