ठसकेबाज लावण्यांनी केले घायाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:56 AM2017-11-01T00:56:41+5:302017-11-01T00:57:05+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवातील सृजन रंग रंगमंचावर दुपारी दोन वाजेपासून प्रसिद्ध लावणी स्पर्धेला सुुरुवात झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रंगमंचावर रूपवान लावण्यवती... त्याच्या जोडीला ठसकेबाज लावण्या गाणारा गायक, ढोलकीवादक अन् समोर सळसळत्या उत्साहाची तरुणाई...असाच माहोल दुपारच्या दोन वाजेपासून ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत कायम होता. निमित्त होत सृजन रंग रंगमंचावरील लावणी स्पर्धेचे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवातील सृजन रंग रंगमंचावर दुपारी दोन वाजेपासून प्रसिद्ध लावणी स्पर्धेला सुुरुवात झाली. लावण्या पाहण्यासाठी सकाळी ११ वाजेपासूनच तरुणाईने सभागृह फुलून गेले होते. शहारासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक अन् विद्यार्थी लावण्या सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होते; मात्र इतर ठिकाणी स्पर्धा सुरू असल्यामुळे लावणीतील स्पर्धकांना रंगमंचावर येण्यास उशीर झाला. यातच दुपार झाली असल्यामुळे अनेकांनी जेवण करूनच सादरीकरण करण्यास प्राधान्य दिले. यात उशीर होत असल्यामुळे संयोजकांनी सैराट चित्रपटातील ‘झिंग झिंग झिंगाट...’ गाणे लावले. यावर तरुण-तरुणींनी चांगलाच ठेका धरला होता. ग्रुपने सर्वजण बेधुंद होऊन नाचत होते. यातच संयोजक लावण्यांचे सादरीकरण करण्यासाठी संघांना बोलावणे धाडत होते. उशीर होत असतानाही रसिकांनी सभागृहातून काढता पाय घेतला नाही. यातच एका कलाकाराने ‘घ्यावा माझा सलामीचा मुजरा... महाराष्ट्राच्या मातीत रुजल कला गुणांचं लेणं... मराठमोळं गाणं...’ ही लावणी सादर केली अन् एकच जल्लोष झाला. रंगमंचासमोरील प्रत्येक जण ठेका धरत होता. यातच पुढील काही वेळ कोणताही संघ सादरीकरणासाठी आला नाही. त्यामुळे लावण्या सादर करण्यात खंड पडला.
यानंतर देवगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने ‘राया वाटलं होत तुम्ही याल...’ ही लावणी सादर करीत सर्वांनाच घायाळ करून टाकले. घोषणा, जल्लोष, शिट्यांचा खणखणाट सुरूच होता. यानंतर ‘नार देखणी, केस सोडून....राखली की मर्जी तुमची’, ‘मला जाऊ द्या ना घरी.. आता वाजले की बारा...’, ‘अप्सरा आली...चांदणी रंग महाल...’ या लावणीने तर जल्लोषाचा कळसच गाठला. ‘भिर भिर भिरती पाखरावानी..कुठच दाणा मिळेना... काखेत कळसा गावाला वळसा कशाला...’ अशा दिलखेचक अदाकारीच्या लावण्यांनी रंगत आणली होती.