पावसात आडोसा शोधताना अंगावर वीज कोसळल्याने मुलीसह तरुण ठार; ८ शेळ्यांचाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 03:29 PM2024-10-22T15:29:36+5:302024-10-22T15:31:52+5:30
बोरमाळ तांडा आणि हनुमंतखेडा शिवारातील दोन घटना
सोयगाव : शेतात काम करणाऱ्या एका तरुणावर व १५ वर्षीय मुलीवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची तर एक महिला भाजल्याची घटना तालुक्यातील बोरमाळ तांडा आणि हनुमंतखेडा येथे सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. अजय नथ्थु राठोड (वय १८ वर्षे, रा. बोरमाळ तांडा) व अश्विनी मच्छिंद्र राठोड (वय १५ वर्षे, रा. हनुमंत खेडा) अशी मृतांची नावे आहेत.
बनोटी परिसरात सोमवारी दुपारी ४ वाजता विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी तिडका शिवारात कापूस वेचणीच्या कामासाठी आलेला अजय नथ्थु राठोड हा तरुण आडोशाला झाडाखाली जात असताना त्याच्या अंगावर वीज पडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर जवळच असलेल्या त्याच्या ८ शेळ्यांवरही वीज पडल्याने त्यांचाही मृत्यू झाला. अजय राठोड याच्या पश्चात आजी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.
दुसरी घटना तिडका शिवारापासून १३ किलोमीटर अंतरावर हनुमंत खेडा शिवारात सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारासच घडली. या शिवारात अनिता मच्छिंद्र राठोड (वय ४० वर्षे) व त्यांची मुलगी अश्विनी मच्छिंद्र राठोड (वय १५ वर्षे) या मायलेकीही शेतात काम करताना अचानक विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने आडोशाला झाडाखाली धावल्या. यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात अश्विनी राठोड हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिची आई अनिता राठोड या भाजल्या. त्यांना परिसरातील शेतकऱ्यांची उपचारासाठी सोयगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. मृत अश्विनी हिच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
बनोटी आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी
दरम्यान, दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. सपुरा कादरी यांनी केली. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. या दोन्ही घटनांचा पोलिस व महसूल विभागाने पंचनामा केला असून याबाबत सोयगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.