'प्रतिष्ठान' मधील युवकांची आव्हानात्मक 'जीवधन किल्ल्या'वर स्वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 07:22 PM2019-11-06T19:22:21+5:302019-11-06T19:22:57+5:30
युवकांनी दोन दिवसात फत्ते केली जीवधन किल्ल्याची चढाई
पैठण : गिरीप्रेमींना खुणावणारा आणि हौशी पर्यटकासह ईतिहास संशोधकांना आव्हान असलेला ऐतिहासिक नाणेघाट. घातक सुळक्यांची ओळख असलेला व ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जाणारा जीवधन किल्ला पैठण येथील युवकांनी दोन दिवसाच्या गिरी मोहिमेत सर केला. पैठणच्या दुर्ग प्रतिष्ठानच्या सदस्यांनी हे साहस केले असून या बद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. पैठण येथील दुर्ग प्रतिष्ठानच्या वतीने दि २ व ३ नोव्हेंबर रोजी दुर्ग भटकंती व अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. या मोहिमेत जीवधन किल्ला,चावंड किल्ला व पैठणचा प्राचीन व्यापारी मार्ग असलेला नाणेघाट ची भ्रमंती करण्यात आली.
पैठण येथील शिवाजी गाढे, बजरंग काळे, विष्णू ससाणे, आबासाहेब जाधव, केदार मिरदे, योगेश लोहारे, महेश गोंडे , राहुल जवरे, ज्ञानेश्वर नवले, आर बी रामावत यांनी ही मोहीम पार पाडली या युवकांना दुर्ग प्रतिष्ठान मुळे गिरी मोहिमेची आवड निर्माण झाली. गेल्या चार वर्षात पैठण दुर्ग प्रतिष्ठानच्या सदस्यांनी महाराष्ट्रातील विविध किल्ल्यासह कळसूबाई शिखरासही गवसणी घातली आहे. यंदा गिर्यारोहकाना आव्हानात्मक असलेला जिवधन किल्ला सर करून नाणेघाट परिसराची भ्रमंती करत निरिक्षणे नोंदवली. दुर्गमार्गाने चालताना कधी दोराच्या सहाय्याने किल्ल्यावर चढाई करावी लागली, गगनस्पर्शी सुळके, घनदाट जंगल, खोल दऱ्या, धोकादायक खिंडीचा सामना करत जीवधन किल्ला सर केला असे जि प कन्या प्रशालेचे शिक्षक बजरंग काळे यांनी सांगितले.
पैठण ते कल्याण सातवाहन कालीन प्राचीन व्यापारी मार्ग
सातवाहन कालीन पैठण ते कल्याण बंदर या व्यापारी मार्गाची नानेघाट म्हणून ओळख आहे. तत्कालीन पैठणच्या सातवाहन सम्राटांनी या नानेघाटाचा विकास करून व्यापारी व प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या नानेघाटाची भ्रमंती करून दुर्ग प्रतिष्ठान सदस्यांनी निरिक्षणे नोंदविली. सातवाहन साम्राज्याची पैठण राजधानी होती. पैठणच्या बाजारपेठेत ग्रीक व रोमन व्यापारी रेशीम, मसाले, हीरे, माणिक व मोती यांचा व्यापार करण्यासाठी येत असत.परदेशातून येणारा सर्व माल हा कल्याणच्या बंदरा वर उतरवत आणि पुढे बैलगाड़ी, खेचरां मार्फत तो जुन्नर च्या दिशेने आणला जात. आजही जुन्नरमध्ये नानेघाट हा सातवाहन कालीन व्यापारी मार्ग अस्तित्वात आहे विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी नानेघाट असलेली अलिकडच्या काळातील कोणशिला तेथे बांधलेली आहे.
२ हजार वर्षापूर्वीचा कर संकलनासाठीचा दगडी रांजण
कल्याण ते पैठण या व्यापारी मार्गावर नानेघाट आहे, या नानेघाटा मधे सातवाहन राणी नागनीकेने व्यापारी आणि प्रवाश्यांच्या विश्रांति साठी लेणी कोरली होती. व्यापारी आणि प्रवाशासाठी ठीकठिकाणी पाण्याचे हौद सुद्धा खोदन्यात आलेले आहेत. दोन हजार वर्षांपुर्वीचा एक मोठा दगडी रांजण आज तिथे पहायला मिळतो. या रांजनाचा उपयोग त्या काळी कर वसुली करण्यासाठी करत असत. एका दिवसात तो रांजन नाण्यांनी भरत असे यावरूनच या घाटाला नानेघाट असे नाव पडले.अशी माहिती आर बी रामावत यांनी दिली. त्या काळी तो रांजन एका दिवसात भरत असे यावरून त्याकाळी नाणेघाट मार्गे रहदारी किती असेल याची कल्पना येते.