मुलाखत देऊन परतणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू; वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा होता आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 12:33 PM2024-08-19T12:33:02+5:302024-08-19T12:33:12+5:30
वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर पडली
छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील कंपनीमध्ये मुलाखत देऊन घरी परतणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१७) सायंकाळी नगर रोडवरील लक्ष्मीमाता मंदिर परिसरात घडली.
शंतनू शिवाजी गाडेकर (वय २४, रा. एन-११, गजानननगर), असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंतनूचे बीबीएचे शिक्षण पूर्ण झाले होते. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर पडलेल्या शंतनूने लगेचच नोकरीचा शोध सुरू केला होता. त्यासाठीच तो वाळूज एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीत मुलाखतीलाही गेला होता.
मुलाखत देऊन परतत असताना नगर रोडवरील लक्ष्मीमाता मंदिर परिसरात त्याची दुचाकी आधी दुभाजकाला धडकली. त्यामुळे भरधाव दुचाकीवरील त्याचा ताबा सुटला आणि तो रस्त्यावर कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. तो रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावरच पडून राहिला. स्थानिकांनी तत्काळ त्याला घाटीत दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलिस जमादार संगीता दराडे करीत आहेत.