तरुणांनी राजकारणापेक्षा अर्थकारणावर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 03:54 PM2019-03-31T15:54:34+5:302019-03-31T15:55:24+5:30

नागसेन फेस्टिव्हल : दुबई हेल्थ केअर सिटीचे अनिल बनकर यांचे आवाहन

The youth should focus on economics more than politics | तरुणांनी राजकारणापेक्षा अर्थकारणावर भर द्यावा

तरुणांनी राजकारणापेक्षा अर्थकारणावर भर द्यावा

googlenewsNext

औरंगाबाद : आंबेडकरी तरुणांनी राजकारणाऐवजी अगोदर अर्थकारण मजबूत करण्यावर भर द्यावा, असे आवाहन दुबई हेल्थ केअर सिटीचे सदस्य डॉ. अनिल बनकर यांनी केले.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने नागसेन फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी यशदाचे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आले. नागसेनवनमधील लुम्बिनी उद्यानात आयोजित या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. अनिल बनकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर माधव बोरडे, प्रा. बी.जी. रोकडे, दौलत मोरे, प्रा. के.एन. बनसोडे आदींची उपस्थिती होती. 

‘जागतिक क्षितिजावरील आंबेडकरी चळवळीचा वेध’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. अनिल बनकर म्हणाले की, यंदाचे हे राजकीय वर्ष आहे. आंबेडकरी चळवळीसाठी बदल घडविण्याचे हे वर्ष आहे. त्यामुळे समाजातील शिक्षित तरुणांनी अधिक गांभीर्याने निर्णय घेतले पाहिजेत. बाबासाहेबांनी शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. तरुणांनी उच्चशिक्षण घेतल्यानंतर स्वत:पुरता विचार न करता आपल्या शोषित, वंचित बांधवांच्या उन्नतीसाठी झटले पाहिजे, तरुणांनी राजकारणात आले पाहिजे, बाबासाहेबांनी दिलेल्या या उपदेशाचा आपण सोयीस्कर अर्थ लावत आहोत. रोज नवनवीन पक्ष-संघटनांना आपण जन्म घालत आहोत. राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा हा उद्देश नाही. बाबासाहेबांचा आर्थिक संघर्ष डोळ्यासमोर ठेवून शिक्षित तरुणांनी निश्चितपणे राजकारणात आले पाहिजे. अर्थकारणाजवळच आंबेडकरी चळवळ दम तोडते आहे, याचे भान ठेवले पाहिजे. आपली आर्थिक ताकद उभी करण्याचा गांभीर्याने विचार केला पािहजे. नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारी साधने निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. 

डॉ. बबन जोगदंड म्हणाले की, अलीकडच्या काळात देशात प्रचंड जातीय संघर्ष वाढला आहे. नीतिमूल्यांची पायमल्ली केली जात आहे. राज्यघटनेची अवहेलना होत आहे. प्रास्ताविक महोत्सवाचे मुख्य निमंत्रक सचिन निकम यांनी केले.

छायाचित्रांचे प्रदर्शन
नागसेन फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी समाजात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल निवृत्त समाजकल्याण सहसंचालक डी.टी. डेंगळे, डॉ. अनिल पांडे आणि मनोहर उबाळे यांचा संयोजन समितीच्या वतीने माधव बोरडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. बी.जी. रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: The youth should focus on economics more than politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.