मेव्हण्याच्या घरात साल्याची ‘हातसफाई’; पावणेपाच लाखांची बॅग लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 12:20 PM2023-05-30T12:20:44+5:302023-05-30T12:21:19+5:30
तब्येत बरी नसल्याचे सांगत घरी आला; रोकड भरलेली बॅग घेऊन पसार
वाळूज महानगर : मेव्हण्याच्या घरात साल्याने ‘हातसफाई’ करीत पावणेपाच लाखांची बॅग लांबविल्याची घटना वाळूज उद्योगनगरीत उघडकीस आली आहे. या चोरीप्रकरणी आरोपी साल्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बगतसिंह हरिसिंह (४२, रा.सिडको वाळूजमहानगर) हे एका खासगी कंपनीत वसुली अधिकारी आहेत. शनिवारी (दि.२७) कंपनीचे ४ लाख ७५ हजार रुपये त्यांच्याकडे होते. सायंकाळी वसुली झालेल्या पैशाची बॅग घेऊन बगतसिंह हे सिडको वाळूजमहानगरात घरी गेले. घरी गेल्यानंतर बगतसिंह यांना त्यांचा साला दशरथसिंह क्रांतीसिंह (२५, रा.राजस्थान) हा घरी दिसल्याने त्यांनी चौकशी केली असता, दशरथसिंह याने आजारी असल्याने, तुमच्या घरी आल्याचे सांगितले. रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बगतसिंह हे पत्नीला सोबत घेऊन पंढरपुरात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले, तर साला दशरथ व बगतसिंह यांची मुले घरात झोपलेली होती.
भाजीपाला खरेदी करून आल्यानंतर बगतसिंह यांना साला दशरथसिंह हा घरातून गायब असल्याचे दिसून आले. यानंतर, बगतसिंह यांनी घरात ठेवलेली पैशाची बॅग बघितली असता, त्यांना बॅग दिसून आली नाही, याप्रकरणी बगतसिंह यांच्या तक्रारीवरून पावणेपाच लाख रुपये लांबविणाऱ्या दशरथसिंह क्रांतीसिंह याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.