शहर सुशोभीकरणाचा तरुणाईने घेतला वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:53 AM2017-08-18T00:53:16+5:302017-08-18T00:53:16+5:30
शहर सुशोभीकरणाचा उपक्रम जेएनईसीच्या आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरामध्ये सध्या काही मुले-मुली उड्डाणपूल आणि मोकळ्या जागी रंगरंगोटी, स्वच्छता आणि बाके, खुर्च्या, खेळण्या ठेवून ती जागा सजवताना दिसतात. ते पाहून आपसुकच कुतूहल जागृत होते. औत्सुक्याचा विषय बनलेला हा शहर सुशोभीकरणाचा उपक्रम जेएनईसीच्या आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी सलीम अली सरोवरापाशी पडीक असलेला जॉगिंग ट्रॅक विकसित केल्यानंतर या विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने संग्रामनगर उड्डाणपुलाखाली व कॅनॉट प्लेस येथील एका मोकळ्या कोपºयाचे सुशोभीकरण केले. शहरातील उड्डाणपुलांखाली असणाºया जागेचा होणारा दुरुपयोग नेहमीच चिंतेचा विषय झाला आहे. लघुशंका करण्यापासून ते जुगार खेळण्यापर्यंतचे गैरप्रकार तेथे घडतात.
हेच हेरून वास्तुकलेच्या विद्यार्थ्यांनी नगरसेविका शोभा बुरांडे यांच्या सहकार्याने आसपासच्या शाळांतील विद्यार्थी व पालकांना वाट पाहण्यासाठी जागा म्हणून संग्रामनगर उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभीकरण केले. शाळा सुटल्यावर पालकांची वाट पाहणाºया विद्यार्थ्यांसाठी येथे झोका, पेंटिंग, विविध प्रकारचे लाइटस् अशा विविध वस्तू लावण्यात आल्या आहेत. सकाळी व सायंकाळी फिरायला येणाºया वृद्धांना, नागरिकांना बसण्यासाठी विविध बेंचेस, स्टुल इतर वस्तूदेखील येथे ठेवण्यात आल्या आहेत. पुलाच्या भिंती व खांबांवर आकर्षक चित्रे रंगवली आहेत.
कॅनॉट कट्टा
शहरात अनेक ठिकाणी मोकळ्या जागा असून, त्या कचराकुंड्या बनल्या आहेत. कॅनॉट प्लेस येथील असाच एक मोकळा कोपरा जेएनईसीच्या या विद्यार्थ्यांनी देखणा केला आहे. कचरा साफ करून तेथे जुन्या सायकल्स, स्कूटर, हातगाडी यांना रंगरंगोटी व दुरुस्त करून बसण्यासाठी बाके म्हणून कल्पक मांडणी केली आहे. तसेच माणुसकीची भिंत व पक्ष्यांसाठी झाडांना पिंजरेदेखील बांधले.
लोकांना बसण्यासाठी, मित्रांना गप्पा मारण्यासाठी एक प्रसन्न कट्टा यानिमित्ताने तयार झाला आहे. त्यासाठी एमजीएम ट्रस्टने आर्थिक मदत केली.
सदरील उपक्रमात साया कपूर, सौमित्र जाधव, वीरेन तावडे, स्फूर्ती रामेकर, अमृता बेदमुथा, कल्याणी सेठी, नम्रता बोरा, इशा महाजन, अंकिता हांगे, नेहा तांगडे, रोमा रोचावाणी, निधी साहुजी, शिवानी श्रीवास्तव, ऋतंभरा केवलराम, मयूर वाघुले, ऋषिकेश वाघ, शेख मुजाहिद आदी विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.