तरुणाची दुचाकी हरवली, सीसीटीव्हीत पोलिसानेच पळवल्याचे आढळले; काय आहे प्रकरण?
By सुमित डोळे | Published: July 28, 2023 11:57 AM2023-07-28T11:57:22+5:302023-07-28T11:57:32+5:30
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, फुटेजमध्ये आपलेच कर्मचारी दिसल्यावर वरिष्ठांनी लावला डोक्याला हात
छत्रपती संभाजीनगर : अंगावर खाकी वर्दी, सोबत पोलिसांच्या वाहनातून उतरून रस्त्यावरील गाडी हँडललॉक नसल्याचे तपासून पोलिस कर्मचारी ती गाडी घेऊन गेला. याची ना वरिष्ठांना कल्पना दिली, ना स्टेशन डायरीला रीतसर नोंद केली. दुसऱ्या दिवशी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पोलिसांनीच दुचाकी नेल्याचे दिसताच नागरिक हादरून गेले. तोपर्यंत गुन्हाही दाखल झाला व फुटेजमध्ये आपलेच कर्मचारी पाहून वरिष्ठांनी डोक्यावर हात मारून घेतला. पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी सहायक आयुक्त संपत शिंदे यांना चौकशीचे आदेश दिले.
औरंगपुऱ्यातील व्यावसायिक निखित मित्तल यांच्या आशा ट्रेडर्स दुकानासमोर त्यांचा कर्मचारी जहीर शेख याने त्याची एचएफ डिलक्स दुचाकी २५ जुलै रोजी रात्री दहा वाजता उभी केली होती. सकाळी त्याला ती आढळून न आल्याने मित्तल यांना हा प्रकार कळवला व सीसीटीव्ही तपासले. तेव्हा फुटेजमध्ये पोलिसच दुचाकी नेत असल्याचे दिसताच सर्वच हादरून गेले. दुपारी दीड वाजेपर्यंत त्यांनी हा प्रकार कोणालाच कळवला नाही, दोन वाजता मात्र सिटी चौकच्या एका अधिकाऱ्याने जहीरला कॉल करून 'तुमची दुचाकी चोरीला गेलीये का, कोठून गेली' अशी विचारणादेखील केली.
जहीरला संशय आल्याने त्यांनी तत्काळ सिटी चौकच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांची भेट घेत फुटेज दाखवले. परदेशी यांनी ठाण्याची स्टेशन डायरी तपासली असता त्यात दुचाकी आणल्याची कुठलीच नोंद आढळली नाही. शिवाय, कोणीही त्यांना तोंडीदेखील कळवले नव्हते. गांभीर्य ओळखून त्यांनी पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांना हा प्रकार कळवला. लोहिया यांनी तत्काळ यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत तपासाच्या सूचना केल्या. आपले प्रकरण अंगलट येत असल्याचे कळताच दुचाकी नेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे व रात्रपाळीवर अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तेव्हा कुठे दुचाकी तर ठाण्यातच आणून उभे केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या कारनाम्यामुळे डोक्याला हात मारून घेतला.
या प्रश्नांमुळे भूमिकेवरच संशय
-२ वाजून ५५ मिनिटांनी पोलिसांनी एक चारचाकी तपासली. यानंतर एका दुचाकीचे हँडल तपासले. तिसऱी दुचाकीची पाहणी करून ते ती दुचाकी नेली पण तीच का नेली कशासाठी ही गाडी निवडली?
-जवळपास १२ मिनिटे दोन कर्मचाऱ्यांनी ती सुरू करण्यासाठी खटाटोप केला. तेव्हाही ती सुरू झाली नाही तर एका कर्मचाऱ्याने ती अक्षरश: पायाने ढकलत ठाण्यात का नेली?
-एक नशेखोर दुचाकीजवळ आढळल्याने आम्ही ती नेली, असा दावा घाेडके या कर्मचाऱ्याने केला. नशेखोराला ठाण्यात नेऊन मग सोडून का दिले? मात्र, मग ठाण्यात त्याची रीतसर नोंद करून सायंकाळपर्यंत वरिष्ठांना का नाही कळवले?
-ठाण्याच्या नियमित जप्तीच्या ठिकाणी ती उभी न करता ठाण्याच्या समोरील बाजूने असलेल्या बोळीत ती का उभी केली?
चौकशी सुरु झाली
पोलिसच दुचाकी नेताना पकडल्याने लाेहिया यांनी तत्काळ सहायक आयुक्त संपत शिंदे यांना चौकशीचे आदेश दिले. शुक्रवारी ते अहवाल सादर करतील. मात्र, प्राथमिक तपासात हा चोरीचा प्रकार निश्चितच नाही. दुचाकी नेण्याचा त्यांच्या इतर भूमिकेची चौकशी सुरू असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.