तरुणाईचा यावर्षी फटाकेमुक्त दिवाळीचा निर्धार; पाडव्याला करणार वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 04:02 PM2020-11-14T16:02:41+5:302020-11-14T16:03:00+5:30
कोरोना आणि फटाक्यांमुळे पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम यामुळे लोकांमध्ये जागरूकता
औरंगाबाद : दिवाळी म्हणजे फटाक्यांचा आवाज आणि विद्युत रोषणाई. जेवढा मोठा आवाज करणारा फटाका, तेवढी त्याची मागणी जास्त, अशी एक धारणा झाली आहे; पण कोरोना आणि फटाक्यांमुळे पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम यामुळे लोकांमध्ये जागरूकता आली असून, अनेक जण फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यास उत्सुक आहेत.
यंदा कोरोनामुळे लोकांमध्ये फटाक्यांची धास्ती दिसून येत आहे. मुंबईसह अनेक महानगरपालिकांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे यंदा फटाके फोडून नाही, तर दिव्यांची आरास लावून दिवाळी साजरी करण्याचे अनेकांनी ठरविले आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमात तरुणाईनेही पुढाकार घेतला असून, मोठ्या आवाजातील फटाक्यांची क्रेझ कमी झाल्याचे दिसत आहे. फटाक्यांचा धूर सर्वसामान्यांसाठीही हानिकारक असतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यात यावर्षी कोरोनाची भीती असल्याने फटाक्याच्या धुरापासून कोरोना रुग्णांना, तसेच कोरोेनातून बऱ्या झालेल्या नागरिकांनाही त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो कोणतेच फटाके न फोडण्याचे आवाहन डॉक्टरही करीत आहेत.
फटाक्यांची दुकाने रिकामीच
दरवर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या दुकानात दिसणारी गर्दी खूपच कमी आहे. अगदी दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन असतानाही शुक्रवारी फटाक्यांच्या दुकानांत अगदीच कमी लोक दिसून आले. त्यामुळे फटाके विक्रेतेही काही प्रमाणात नाराज दिसून आले. जे लोक खरेदीसाठी येत आहेत, तेही मोठ्या आवाजातील फटाके घेण्याचे टाळून भुईचक्र, अनार असे रोषणाई करणारे फटाके घेण्यास प्राधान्य देत आहेत. दरवर्षी हजार रुपयांचे फटाके घेणारे यंदा ५०० ते ६०० रुपयांत खरेदी आटोपती घेत आहेत, असे काही फटाके विक्रेत्यांनी सांगितले.
फटाके फोडण्याऐवजी वृक्षारोपणावर भर
दरवर्षीच आम्ही फटाके वाजविणे टाळतो; पण यंदा मात्र वी फॉर एन्व्हायर्नमेंटच्या सगळ्या सदस्यांनीच फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला आहे. यावर्षी आमच्या ग्रुपचा एकही सदस्य एकही फटाका फोडणार नाही. उलट दिवाळीच्या पाडव्याचा मुहूर्त साधून आम्ही ग्रुपचे सर्व सदस्य वेगवेगळ्या भागांत वृक्षारोपण करणार आहोत.
- मेघना बडजाते, वुई फाॅर एन्व्हायर्नमेंट