जिद्दीच्या जोरावर मिळविले युपीएससीत यश
By Admin | Published: June 13, 2014 12:13 AM2014-06-13T00:13:11+5:302014-06-13T00:39:45+5:30
अभिमन्यू कांबळे, हिंगोली विद्यालयीन जीवनापासूनच प्रशासकीय सेवेत जाण्याची मनाशी खुणगाठ बांधून कुठलाही क्लास न लावता औंढा नागनाथ येथील माजी गटविकास अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांना यश मिळाले आहे.
अभिमन्यू कांबळे, हिंगोली
विद्यालयीन जीवनापासूनच प्रशासकीय सेवेत जाण्याची मनाशी खुणगाठ बांधून कुठलाही क्लास न लावता केलेल्या प्रयत्नांना अखेर औंढा नागनाथ येथील माजी गटविकास अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांना यश मिळाले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत भोकरे यांनी देशातून ८८४ वा क्रमांक पटकाविला आहे.
परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील वालूर येथील रहिवासी असलेल्या सुनील भोकरे यांची घरची आर्थिक स्थिती फारसी समाधानकारक नव्हती. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भोकरे यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण औरंगाबाद येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात राहून तेथील गोदावरी पब्लिक स्कुलमधून पूर्ण केले. त्यानंतर लातूरच्या राजर्षी महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण केली. त्यानंतर औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी २००७ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचा अभ्यास सुरू केला. २००८ मध्ये त्यांना लागलीच यश मिळाले व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गटविकास अधिकारी वर्ग ‘अ’ या पदासाठी त्यांची निवड झाली. औंढा नागनाथ येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांना पहिलीच नियुक्ती मिळाली; परंतु शालेय जीवनापासूनच त्यांनी प्रशासकीय सेवेत चांगल्या पदावर काम करण्याचे स्वप्न बाळगले होते. त्यामुळे यापदावर काम करीत असतानाही त्यांचे मन रमले नाही व त्यांनी एमपीएससी व युपीएससी या दोन्ही परिक्षेचा अभ्यास नोकरी करीत सुरूच ठेवला. २०१३ मध्ये त्यांची एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या पदासाठी निवड झाली. दुसरीकडे त्यांनी जवळपास तीन वेळा युपीएससी परिक्षेत यश मिळविण्याचा प्रयत्न केला; परंतु मुलाखतीपर्यंत जावून त्यांच्या पदरी यश पडले नाही; परंतु प्रयत्नांची पराकाष्टा त्यांनी चालूच ठेवली. चौथ्या प्रयत्नात युपीएससीच्या मुख्य परिक्षेत त्यांना यश मिळाले. मुलाखतीची तयारी करण्यासाठी त्यांनी शासकीय सेवेतून रजा मिळावी, यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांच्याकडे विनंती केली. बनसोडे यांनी तशी शिफारस व विनंती राज्य शासनाकडे केली. राज्य शासनाने ही विनंती मान्य करून भोकरे यांना साडेतीन महिन्यांची रजा दिली. या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत भोकरे यांनी दिल्ली येथे जावून मित्रांसोबत राहून युपीएससीच्या मुलाखतीची तयारी केली. त्यानंतर मुलाखतीची प्रकियाही झाली. त्यात त्यांना यश मिळाले. गुरूवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने उमेदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये देशातून सुनील भोकरे यांचा ८८४ वा क्रमांक आला. भोकरे यांना आयआरएस (भारतीय महसूल सेवा) हे कॅडर मिळणार आहे.
ठरविलेले ध्येय केले साध्य- सुनील भोकरे
शालेय जीवनापासूनच प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय मनाशी बाळगले होते. त्यानुसार तयारी केली. औरंगाबाद येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिको असोसिएशन ग्रुप मधील मित्रांनी या ध्येयासाठी प्रोत्साहन दिले. शिवाय चुलते नारायणराव भोकरे यांनी वेळोवेळी आर्थिक मदत केली. तसेच मेव्हणे सुधाकर शिंगडे यांनी पाठबळ दिले. त्यामुळेच हे यश संपादन करता आले, अशी प्रतिक्रिया सुनील भोकरे यांनी दिली. दररोज विविध वृत्तपत्रांचे वाचन, तसेच द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राचे आॅनलाईन वाचन अभ्यासाच्या कामाला आले. अलिकडे युपीएससीचा पॅटर्न बदलला आहे. आता या परिक्षेमध्ये शासनाचे धोरणात्मक निर्णय, विविध योजना आदींबाबतची माहिती विचारली जात आहे. त्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी दररोज सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी १ तास राज्यसभा टीव्ही व आॅल इंडिया रेडिओ वरील चर्चा ऐकल्या. त्याचा परिक्षेमध्ये खूप फायदा झाला. शिवाय निवडलेल्या विषयांवर मेहनत घेतली. त्याचे फळ मिळाले. कोणताही क्लास न लावला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना युपीएससीमध्ये यश मिळविता येते. मनामध्ये कसलाही न्युनगंड बाळगण्याची गरज नाही, असेही भोकरे म्हणाले.