रेल्वेने तहान भागविलेल्या लातुरात यंदा शून्य टँकर

By Admin | Published: May 12, 2017 11:40 PM2017-05-12T23:40:35+5:302017-05-12T23:41:29+5:30

लातूर : यंदा मात्र जिल्ह्यात एकही टँकर नाही की, कोण्या गावात टंचाईच्या झळा नाहीत.

The zero tanker this year, | रेल्वेने तहान भागविलेल्या लातुरात यंदा शून्य टँकर

रेल्वेने तहान भागविलेल्या लातुरात यंदा शून्य टँकर

googlenewsNext

हणमंत गायकवाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : गतवर्षी लातूर शहर व जिल्ह्यात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्याने रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली होती. शिवाय, जिल्हाभरात सरकारी यंत्रणेसह सामाजिक संस्था, संघटनांच्या जवळपास १३०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा मात्र जिल्ह्यात एकही टँकर नाही की, कोण्या गावात टंचाईच्या झळा नाहीत. जलसंधारणाच्या कामाचा चांगला इफेक्ट झाला असून, दोन मोठ्या प्रकल्पांसह मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये चांगला पाणीसाठा आहे. जे की, गतवर्षी उन्हाळ्यात कोरडेठाक होते.
गतवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात अभूतपूर्व पाणीटंचाईने लातूरकर हैराण झाले होते. मांजरा प्रकल्पासह जिल्ह्यातील पाण्याचे सर्व स्त्रोत आटले होते. डोंगरगाव, माकणी, धनेगाव बॅरेजेस या दोन-तीन स्त्रोतांत थोडेबहुत पाणी होते. अन्य स्त्रोत पूर्णत: कोरडे पडले होते. यामुळे लातूरला मिरजेहून रेल्वेने पाणी आणावे लागले. शिवाय, टँकरद्वारेही पाण्याचे संकलन व वितरण करावे लागले.
शहरात मनपाचे ७० तर विलासराव देशमुख फाऊंडेशनचे ७०, शिवसेना, व्हीएस पँथर, अष्टविनायक प्रतिष्ठान, दयानंद शिक्षण संस्था, तय्यबा चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र विकास आघाडी, मनसे, महिंद्रा कोटक बँक, मारवाडी शिक्षण संस्था आदी संस्था-संघटनांचे मिळून ४६६ टँकर शहरात मोफत पाणीपुरवठा करीत होते. तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे ३५७ व विविध संस्थांचे १९२ असे एकूण शहर व जिल्ह्यात १३०० टँकरचा मोफत पाणीपुरवठा होता. यंदा मात्र मुबलक पाणीसाठा असल्याने एकही टँकर नाही. यंदा पिण्यासाठी तर सोडाच; घरगुती वापरासाठीही पाणी विकत घेण्याची गरज नाही.
या पाणीटंचाईमुळे जलसाक्षरता वाढली असून, शहरात बहुतांश बोअरचे पुनर्भरण करण्यात आले असून, छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची योजना यशस्वी राबविली आहे. त्यामुळे यंदाच्या तीव्र उन्हाळ्यातही पाणीपातळीत समतोल आहे. शहरात मनपाच्या मालकीचे ६०० बोअर असून, यंदाच्या उन्हाळ्यात एकही बोअर बंद पडल्याचे ऐकिवात नाही.

Web Title: The zero tanker this year,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.