'झीरो टॉलरन्स पॉलिसी राबवणार'; संदीप पाटील यांनी स्वीकारला पोलिस आयुक्तपदाचा पदभार

By सुमित डोळे | Published: June 1, 2024 01:26 PM2024-06-01T13:26:47+5:302024-06-01T13:28:01+5:30

छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी नक्षलवाद्यांना धडकी भरवणारे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या संदीप पाटील यांची नियुक्ती

Zero tolerance policy against unethical incidents; Sandeep Patil took over as Chhatrapati Sambhajinagar Police Commissioner | 'झीरो टॉलरन्स पॉलिसी राबवणार'; संदीप पाटील यांनी स्वीकारला पोलिस आयुक्तपदाचा पदभार

'झीरो टॉलरन्स पॉलिसी राबवणार'; संदीप पाटील यांनी स्वीकारला पोलिस आयुक्तपदाचा पदभार

छत्रपती संभाजीनगर : नक्षलवाद्यांना धडकी भरवणारे डॅशिंग अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेेले आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांच्याकडे शहराच्या पोलिस आयुक्तपदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा पाटील शहरात दाखल झाले. आज शनिवारी सकाळी त्यांनी पदभार स्वीकारला. 

३१ मे रोजी मावळते पोलिस आयुक्त मनोज लोहिया ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यानंतर आयुक्तपदासाठी विविध नावांची चर्चा सुरू होती. त्यात प्रामुख्याने विदर्भ व पुण्यात कार्यरत अधिकाऱ्यांची नावे अग्रस्थानी होती. त्यातच पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पाटील यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला. ४ जून रोजी मतमाेजणी असून, लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे. त्यामुळे तत्काळ आयुक्तपदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा आदेश देण्यात आला होता. सध्या नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख असलेले पाटील नागपूरमधून कारभार सांभाळतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांची विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे.

सांगली जिल्ह्यात जन्म झालेल्या पाटील यांचे साताऱ्याच्या सैनिकी स्कूलमध्ये शिक्षण झाले. इस्लामपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन त्यांनी दिल्लीत यूपीएससीची तयारी केली. त्यांची पहिली पोस्टिंग चंद्रपूर येथे झाली. त्यानंतर खामगाव, गडचिरोली, सातारा, पुणे ग्रामीण येथे उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. नक्षलवादाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी तब्बल १७४ नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करायला लावून त्यांना मुख्य प्रवाहात आणले होते. डीआयजी असतानाच्या कार्यकाळात मर्टिनटोलाच्या जंगलात झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा केंद्रीय नेता मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षलवादी ठार झाले हाेते. तेव्हा पाटील देशभरात चर्चेत आले होते.

सर्वांना सुरक्षा, औद्योगिक प्रगतीला चालना मिळावी 
भ्रष्टाचार, स्ट्रीट क्राइम, कम्युनल व्हायलन्स यांच्याविरोधात झीरो टॉलरन्स अशी कामाची पद्धत राहील. सायबर, ट्राफिक आदीकडे विशेष लक्ष देणार. तसेच विद्यार्थी, महिला यांच्यासह सर्वांना सुरक्षित वाटावे, शहरातील औद्योगिक प्रगतीला चालना मिळावी यासाठीची पोलिसांची भूमिका सार्थपणे निभावू. 
- संदीप पाटील, पोलिस आयुक्त

Web Title: Zero tolerance policy against unethical incidents; Sandeep Patil took over as Chhatrapati Sambhajinagar Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.