या जिल्हा परिषद शाळेत १२ लाख रुपयांच्या प्रयोगशाळेत विद्यार्थी गिरवताहेत विज्ञानाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 07:58 PM2020-03-09T19:58:53+5:302020-03-09T20:03:29+5:30
मालुंजा बु. हे ९७० लोकसंख्येचे गाव. या गावात पहिली ते आठवीपर्यंत जि.प.ची शाळा आहे
- राम शिनगारे
औरंगाबाद : गावकरी व शिक्षकांनी एकत्रित येऊन शासकीय योजना, कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व फंडाचा (सीएसआर) सुयोग्य वापर केल्यास शाळेचा कायापालट होतो. याचे उत्तम उदाहरण गंगापूर तालुक्यातील मालुंजा बु. गावातील जिल्हा परिषदेची शाळा ठरली आहे. १२ लाख रुपये खर्च करून या शाळेत तयार केलेल्या प्रयोगशाळेत विद्यार्थीविज्ञानातील धडे गिरवत आहेत.
मालुंजा बु. हे ९७० लोकसंख्येचे गाव. या गावात पहिली ते आठवीपर्यंत जि.प.ची शाळा असून, १८५ विद्यार्थीशिक्षण घेतात. यात ९५ मुली आणि ९० मुले आहेत. राज्य शासनाने ग्रामीण भाग बदलण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची सुरुवात १ एप्रिल २०१७ रोजी केली. या योजनेत १ हजार गावांना आदर्श बनविण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी खाजगी कंपन्यांचा सीएसआर फंड वापरला जातो. या योजनेत मालुंजा बु.चा समावेश केल्यानंतर शाळेवर अधिक लक्ष देण्यात आले. यासाठी ग्रामपरिवर्तक शशिकांत शेजूळ, सरपंच अंजली डोळस, उपसरपंच रमेश साळुंके, ग्रामसेवक मनोज डोळसे यांनी विशेष सहकार्य केले.
विद्यार्थ्यांसाठी उत्तम दर्जाच्या वर्गखोल्या, शौचालय बनविण्यात आले. विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी सोलर बसविले. मध्यान्ह भोजनासाठी अत्याधुनिक किचन बनविले. संगणकाची लॅब तयार केली. पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले. शाळेत सर्वत्र सीसीटीव्ही बसवत रंगरंगोटी केली. प्रत्येक वर्गात स्मार्ट एलईडी टीव्ही बसविण्यात आला. यासाठी लागणारा निधी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शशिकांत शेजूळ यांनी दिली. या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यानंतर शाळेतील सात शिक्षकांनी गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवत शाळेचा कायापालट केल्याची माहिती शिक्षक दिनेश देशपांडे यांनी दिली.
मुलांना स्वच्छतेची सवय लागावी यासाठी ‘हात धुवा’ अभियानासह रांगोळी, गीतगायन, वादविवाद, लेखन स्पर्धाही घेण्यात येतात. विज्ञान दिनानिमित्त २८ फेब्रुवारी रोजी भरविण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनासाठी परिसरातील १० शाळांमधील ७०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण प्रयोगही प्रयोगशाळेत दाखविण्यात आले होते. या सर्व उपक्रमांसाठी मुख्याध्यापक अनिल काळे, सहशिक्षक दिनेश देशपांडे, रामनाथ सुंब, जालिंदर चव्हाण, दिलीप अलंजकर, विद्या डवले, सुवर्णा शिरसाट यांच्यासह शशिकांत शेजूळ परिश्रम घेत आहेत.
शाळेत चालतात हे शैक्षणिक उपक्रम
मालुंजा बु. येथील जि.प. शाळेत प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगशाळेच्या माध्यमातून संशोधन, विज्ञानातील प्रयोगाची माहिती दिली जाते. मुला-मुलींना शाळा भरण्यापूर्वी दररोज एक तास कराटे प्रशिक्षण दिले जाते. शाळेत १,५०० पुस्तकांचे ग्रंथालय उभारले असून, मुलांना दररोज वाचण्यासाठी पुस्तक दिले जाते. वर्तमानपत्र वाचण्याची सवयही विद्यार्थ्यांना लावली जाते. संगणक प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा दररोज एक तास घेतला जातो.
मालुंजा बु. येथील जि.प. शाळेची माहिती
स्थापना : १९४७
वर्ग : पहिली ते आठवी
विद्यार्थी : १८५ (मुले ९५, मुली ९०)
शिक्षक : ७
गावची लोकसंख्या : ९७०