छताला तडे गेल्याने जिल्हा परिषदेची इमारत बनली धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 03:21 PM2019-08-23T15:21:23+5:302019-08-23T15:39:35+5:30
ऐतिहासिक वारसा लाभलेली इमारत ८ दिवसांत रिकामी करणार
औरंगाबाद : ऐतिहासिक वारसा लाभलेली जिल्हा परिषदेची इमारत वापरासाठी धोकादायक बनली आहे. इमारतीच्या छताला तडे गेल्याचे निदर्शनास आल्यामुळे येत्या ८ दिवसांत ती रिकामी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी दिली.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेची इमारत आहे. या ठिकाणाहून जिल्ह्याचा कारभार करण्यात येतो. या इमारतीला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून, सततचा वापर आणि निकृष्ट डागडुजीमुळे इमारतीची अवस्था जीर्ण बनली आहे. मागील आठवड्यात समाजकल्याण सभापती धनराज बेडवाल यांचे दालन गळू लागल्याने, स्लॅबच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम सुरू असतानाच बसलेल्या हलक्या हादऱ्यांनी त्यांच्या दालनातील सिलिंगचा काही भाग अचानक कोसळला होता. त्यावेळी दालनात जात असताना महिला समाजकल्याण निरीक्षक थोडक्यात बचावले. मंगळवारी वित्त विभागाच्या लेखाधिकारी साधना बांगर यांच्या दालनातील सिलिंगचा काही भाग कोसळला. त्यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सूचना देऊन दुरुस्ती करण्यास सांगितले. तेव्हा अभियंत्यांनी पाणी झिरपण्याचे कारण शोधण्यासाठी खोदकाम केले असता स्लॅबला भेगा पडल्याचे दिसून आले. गेल्या अनेक वर्षांत स्लॅबची अनेकदा दुरुस्ती झाली असून, थरावर थर टाकलेले आहेत. हे थर काढल्यानंतर मुख्य स्लॅबवरील भेगा दिसून आल्या. विशेष म्हणजे दोन-तीन ठिकाणी स्लॅब खचल्याचे दिसून आले.
( जिल्हा परिषद इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल अभियंत्यांच्या घरी )
या घटनेनंतर बुधवारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली. त्याचवेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे व जि.प. अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांच्या दालनाच्या छतालाही तडे गेल्याचे दिसून आले. दोन दिवसांपासून केलेल्या पाहणीनंतर गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, अशोक शिरसे यांनी पाहणी केली. तेव्हा ही इमारतीच धोकादायक बनली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे इमारत येत्या आठ दिवसांत रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लेखा विभाग समुपदेशन केंद्रात हलविणार
लेखा विभाग तात्काळ महिला समुपदेशन केंद्रात हलविण्यात येणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दालने आणि सामान्य प्रशासन विभागाचेही लवकरच स्थलांतर केले जाणार असल्याचे अशोक शिरसे यांनी सांगितले. इमारत भाडेपट्ट्याने घेण्यासाठी शोध सुरु केला आहे.