ध्येयवेड्या शिक्षकांमुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी देतात इंग्रजीत भाषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 02:54 PM2019-08-16T14:54:17+5:302019-08-16T15:50:45+5:30

स्पर्धा परीक्षेच्या प्रश्न मंजूषेमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात भर 

Zilla Parishad gives students in Zila Parishad speech in English because of their talented teachers | ध्येयवेड्या शिक्षकांमुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी देतात इंग्रजीत भाषण

ध्येयवेड्या शिक्षकांमुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी देतात इंग्रजीत भाषण

googlenewsNext
ठळक मुद्देखाजगी शाळा सोडून पालकांची पसंती

- अंबादास एडके 

दावरवाडी :केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी सतत धडपडणाऱ्या शिक्षकांच्या परिश्रमाने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, दावरवाडी (ता. पैठण) या शाळेने आपल्या सततच्या परिश्रमांच्या जोरावर विद्यार्थ्यांतील शिक्षणाचा दर्जा सुधारून गुणवत्तेत भरभरून वाढ केली आहे. म्हणून आजघडीला या शाळेतील दुसरी, तिसरीचे विद्यार्थी इंग्रजीतून भाषण करून आपल्या शाळेचे नाव उंचावत आहेत.

दावरवाडी जि.प. शाळेची स्थापना सन १८८८ मध्ये झाली असून, आजपर्यंत या शाळेतून शेकडो अधिकारी, पदाधिकारी, समाजसेवकासह परदेशातील अमेरिकेसारख्या देशातही याच शाळेतील विद्यार्थी अभियंता म्हणून कामगिरी बजावत आहेत. या केंद्रात केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक हेदेखील याच शाळेचे विद्यार्थी आहेत. आज या शाळेने इंग्रजी शाळेवर मात करीत पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गात एकूण २९० एवढे विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. त्यात मुले १५७, तर मुली १३३ आहेत. दिवसेंदिवस शाळेचा पट वाढतच चालला आहे. शाळेत पहिली ते चौथीच्या वर्गाची एक तुकडी सेमी इंग्रजी माध्यमाची आहे. यामुळे इंग्रजी माध्यमातील मुले या मराठी शाळेत प्रवेश घेत आहेत. शिक्षणासाठी संगणक, लॅपटॉप,  प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायी व डिजिटल पद्धतीने आधुनिक शिक्षण देण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शाळेला वेळोवेळी व्यवस्थापन समितीसह ग्रामपंचायतीचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. सरपंच उत्तमराव खांडे, उपसरपंच चंद्रशेखर सरोदे, ग्रामविकास अधिकारी ए.बी. काकडे यांच्या सहकार्याने शाळेला पाण्याची टाकी, कीचन शेड, वॉल कंपाऊंड, संगणक संच शाळेसाठी देण्यात आलेले आहेत.

शाळेत राबविले जाणारे उपक्रम
शाळेत दररोजच्या परिपाठामध्ये सामान्य ज्ञानावर अधारित प्रश्न घेऊन त्यावर स्पर्धा परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांचे वाढदिवस गरजूंना मदत करून साजरे केले जातात. आठवड्यातून एक दिवस दप्तरमुक्त शाळा भरविण्यात येते, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, ज्ञानरचनावाद अध्यापन करणे, नवोदय शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी.

शाळेचे भविष्यातील उपक्रम
शाळेतील विद्यार्थ्यांना आतापासूनच स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्याना इंग्रजीचे धडे दिले जातील.

सर्वांचा मोलाचा सहभाग 
शाळेच्या आलेख उंचाविण्यासाठी आणखी प्रयत्न करणार असून, समाजसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न होईल. शाळेच्या यशामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे पालक, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षकांचा मोलाचा सहभाग आहे. 
     -विश्वंभर मरकड मुख्याध्यापक 

विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर 
आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वेळोवेळी नवनवीन उपक्रम राबवले जातात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल विशेष गोडी निर्माण झाली आहे. डिजिटल शिक्षण तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग आणि विविध क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली आहे. 
 - सुरेखा अबासाहेब खांडे, (शालेय समिती आध्यक्षा)

पालक काय म्हणतात?
- शाळेची गुणवत्ता पाहता येथील जिल्हा परिषदेची शाळा इंग्रजी माध्यमांच्या शाळेपेक्षा सरस वाटत आहे. याबाबत शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. यामुळे खाजगी शाळांतील विद्यार्थीसुद्धा जि.प. शाळेत येत आहेत. ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. 
- संतोष धारे 

- शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाखाली विद्यार्थी कोणत्याच विभागात मागे नाहीत. सांस्कृतिक तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साहात सहभाग असतो, तसेच डिजिटल तंत्रज्ञानात विद्यार्थी पुढेच आहे. - मिठ्ठू नन्नवरे 

Web Title: Zilla Parishad gives students in Zila Parishad speech in English because of their talented teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.