जिल्हा परिषदेचे ‘सीएसआर’ निधीसाठी कंपन्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 07:44 PM2018-09-19T19:44:53+5:302018-09-19T19:46:05+5:30
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी यासाठी काही उद्योगांना पत्रव्यवहार केला आहे
औरंगाबाद : मंजूर नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णसेवा सुरू करण्यासाठी उपकरणांची प्रतीक्षा आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी यासाठी काही उद्योगांना पत्रव्यवहार केला असून, ‘सीएसआर’ फंडातून आरोग्य केंद्रांना उपकरणे खरेदी करण्यासाठी निधी देण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात सध्या ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे व २७९ उपकेंद्रे कार्यान्वित आहेत. ३० हजार लोकसंख्येच्या गावांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, तर ५ हजार लोकसंख्येसाठी उपकेंद्र सुरू करण्याचा मानक आहे. त्यानुसार जिल्ह्यात नव्याने वाळूज, शिवना, चौका, पिंपळगाव वळण आणि भराडी असे ५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, तर ४२ उपकेंद्रांना शासनाची मान्यता मिळाली आहे.
त्यापैकी वाळूज व शिवना येथे आरोग्य केंद्रांसाठी नवीन इमारत तयार करण्यात आली.
वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरित करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मनुष्यबळही मंजूर झाले आहे; पण केवळ उपकरणे व फर्निचरसाठी निधीची गरज आहे. त्यासाठी अधिक वेळ वाया न घालवता वाळूज परिसरातील उद्योगांना ‘सीएसआर’ फंडातून निधी देण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.
मंजूर ४१ उपकेंद्रांपैकी १४ उपकेंद्रांच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. ४ इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे, तर २४ उपकेंद्रांच्या इमारतीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. मंजूर उपकेंद्रांपैकी औरंगाबाद तालुक्यात १०, फुलंब्रीत ४, वैजापूर १२, गंगापूर ५, कन्नड ३, तर पैठण तालुक्यात ८ उपकेंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना
ग्रामीण रुग्णसेवा अधिक तत्पर व दर्जेदार करण्यावर जिल्हा आरोग्य विभागाने भर दिला असून, यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व संलग्नित अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली न येता अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांचा अहवाल तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयास कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी