जिल्हा परिषदेची इंग्रजी शाळांना नोटीस
By Admin | Published: June 24, 2014 12:37 AM2014-06-24T00:37:31+5:302014-06-24T00:39:54+5:30
नांदेड : बालकांचा शिक्षणाचा मोफत हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेने बोलावलेल्या कार्यशाळेस गैरहजर राहणाऱ्या
नांदेड : बालकांचा शिक्षणाचा मोफत हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेने बोलावलेल्या कार्यशाळेस गैरहजर राहणाऱ्या जिल्ह्यातील १७ शाळांच्या मुख्याध्यापकांना जिल्हा परिषदेने नोटीस बजावली आहे़
शनिवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश नियमाच्या अंमलबजावणीसंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली़ या कार्यशाळेत शहर व परिसरातील सर्व इंग्रजी शाळा तसेच गर्दीच्या शाळांच्या मुख्याध्यापक, संस्थाचालकांना बोलावण्यात आले होते़ मात्र जिल्हा परिषदेने बोलावलेल्या या कार्यशाळेकडे १७ शाळांच्या मुख्याध्यापकांनी पाठ फिरवत प्रतिनिधींनी पाठवले़ हे प्रतिनिधीही शाळेच्या कारभाराबाबत अनभिज्ञच होते़ जि़ प़ च्या पदाधिकारी व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचारलेली माहिती सांगण्यास ते असमर्थ ठरले़ परिणामी अनुपस्थित मुख्याध्यापकांना नोटीस बजावण्यात आली़ त्यामध्ये केंब्रिज इंग्रजी स्कूल बारड, सनराईज इंग्रजी स्कूल नरसी, न्यू प्रायमरी इंग्रजी स्कूल नायगाव, ईगल इंग्रजी स्कूल रातोळी, आॅक्सफर्ड इंग्रजी स्कूल नवामोंढा, विद्याविकास स्कूल, व्ही़ पी़ इंग्लीश स्कूल पूर्णा रोड, ग्यानमाता हायस्कूल, ब्ल्यू बेल्स नायगाव, मॉडर्न इंग्लीश स्कूल माहूर, शांतीनिकेतन इंग्लीश स्कूल नांदेड, राजर्षी शाहू हायस्कूल वसंतनगर, एमपीएस इंग्लीश स्कूल आणि लिटल फ्लॉवर इंग्लीश स्कूल बिलोली या शाळांचा समावेश असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली़
दरम्यान, शिक्षण विभागाने दुर्बल व वंचित घटकातील मुलांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासंदर्भात घेतलेल्या कार्यशाळेमुळे चांगली जनजागृती झाल्याचे पालकांनी सांगितले़ (प्रतिनिधी)