जिल्हा परिषदेचे आता ६२ गट
By Admin | Published: August 20, 2016 01:05 AM2016-08-20T01:05:07+5:302016-08-20T01:13:26+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये दोनने वाढ झाली असून, पंचायत समितीचे ४ गण वाढले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जि.प.चे ६२, तर पंचायत समितीचे १२४ सदस्य निवडून येतील.
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये दोनने वाढ झाली असून, पंचायत समितीचे ४ गण वाढले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जि.प.चे ६२, तर पंचायत समितीचे १२४ सदस्य निवडून येतील. सन २०११ च्या जनगणनेनुसार राज्य निवडणूक आयोगाने गट आणि गणांची फेररचना केली आहे.
सध्या जिल्हा परिषदेचे ६० गट असून, पंचायत समितीचे १२० गण कार्यरत आहेत. नव्या फेररचनेनुसार औरंगाबादलगतचे सातारा व देवळाई हे गट महापालिकेत तर फुलंब्री व सोयगाव हे नगरपंचायतमध्ये समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे हे चारही गट कमी न होता त्यांच्या लगत असलेल्या मोठ्या गावांना गटाचा दर्जा मिळेल. नव्या फेररचनेत औरंगाबाद, पैठण आणि वैजापूर या तीन तालुक्यांत (पंचायत समिती) प्रत्येकी एका गटाची वाढ झाली आहे. असे असले तरी कन्नड तालुक्यातील एक गट कमी झाला आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ६२ सदस्यांपैकी ३१ महिला सदस्यांना निवडून द्यावे लागेल. यामध्ये खुल्या प्रवर्गातील १६ महिला, अनुसूचित जाती प्रवर्गातील ४ महिला, अनुसूचित जमाती प्रवर्गातील २ महिला आणि ओबीसी प्रवर्गातील ९, अशा ३१ महिला सदस्यांचा समावेश राहील. याशिवाय खुल्या प्रवर्गातील १८ पुरुष सदस्य, अनुसूचित जाती प्रवर्गातील ४, अनुसूचित जमाती प्रवर्गाचा १ सदस्य आणि ओबीसी प्रवर्गाचे ८, असे एकूण ३१ सदस्य निवडून द्यावे लागणार आहेत.