जिल्हा परिषदेत पुन्हा काँग्रेस आघाडी यशस्वी
By Admin | Published: September 28, 2014 11:34 PM2014-09-28T23:34:51+5:302014-09-28T23:51:59+5:30
नांदेड : जिल्हा परिषदेत अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने वर्चस्व कायम राखताना विरोधकांना नामोहरम केले़
नांदेड : जिल्हा परिषदेत अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने वर्चस्व कायम राखताना विरोधकांना नामोहरम केले़ अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मंगला गुंडिले आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीप धोंडगे यांनी ४५ विरूद्ध १७ अशा मतफरकाने विजय मिळविला़
जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने अध्यक्षपदासाठी वाजेगाव गटातून निवडून आलेल्या मंगला गुंडिले यांना उमेदवारी दिली़ त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या देगलूर तालुक्यातील करडखेड गटातील महादेवी वाडेकर यांनी अर्ज भरला होता़ हात उंचावून झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या गुंडिले यांना ४५ मते पडली़ उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप धोंडगे यांनी तर त्यांच्या विरोधात भाजपाचे लक्ष्मण ठक्करवाड यांनी अर्ज भरला होता़ धोंडगे यांना ४५ तर ठक्करवाड यांना १७ मते पडली़ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत जाण्याची भूमिका जाहीर केली होती़ राष्ट्रवादीनेही सहकार्य करण्याची तयारी दर्शविताना कोणतेही आढेवेढे घेतले नाही़ अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे हा फॉर्म्युला ठरविण्यात आला़ काँग्रेसने मंगला गुंंडिले व सिंधुताई कमळेकर यांच्यापैकी गुंडिले यांना संधी दिली़ तर राष्ट्रवादीने दिलीप धोंडगे यांना संधी दिली़
सेना-भाजपाने या निवडणुकीत विरोधी पक्षाची भूमिका बजावताना अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी उमेदवार दिले होते़ शिवसेनेच्या वत्सला पुयड यांनी उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली होती़ मात्र ती अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत मागे घेतली़ सेनेची ९ व सहयोगी ३ भाजपा ४ व एक सहयोगी अशी १७ मते सेना भाजपा उमेदवारांना मिळाली़ तर काँग्रेस आघाडीला काँग्रेसचे २५ व दोन सहयोगी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची १८ मते मिळाली़ भारिप बहुजन महासंघाचे दशरथ लोहबंदे या निवडणुकीत गैरहजर राहिले़
नूतन अध्यक्षा मंगला गुंडिले यांनी जि़ प़ त काम करताना भेदभाव न करता सर्वांना न्याय देण्याची भूमिका राहणार असल्याचे सांगितले़ त्यात शिक्षण आणि आरोग्य या विषयाला प्राधान्य राहणार आहे़ जि़ प़ त काम करताना दबावाला बळी पडणार नसल्याचे सांगितले़
उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनीही आपल्या निवडीमुळे युवकांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे सांगितले़ जिल्हा परिषदेत प्रलंबित असलेल्या बीओटी प्रकल्पाला गती देवून कंधारसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या व्यापाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे़ यातून जिल्हा परिषदेचे उत्पन्नही वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे धोंडगे यांनी सांगितले़
(प्रतिनिधी)