छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांना मिळाले ५१८ नवीन शिक्षक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 08:08 PM2024-08-07T20:08:20+5:302024-08-07T20:08:42+5:30

पवित्र पोर्टलद्वारे निवड : मंजूर पदांच्या ९५ टक्क्यांपर्यंत शिक्षक उपलब्ध

Zilla Parishad schools got 518 new teachers in Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांना मिळाले ५१८ नवीन शिक्षक

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांना मिळाले ५१८ नवीन शिक्षक

छत्रपती संभाजीनगर : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी ३३६ जणांची नियुक्ती केली होती. त्यामध्ये आणखी १८२ जणांची भर पडली आहे. इतर जिल्ह्यांतून १४० शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये रुजू झाले. त्यामुळे एकूण मंजूर पदांच्या ९५ टक्क्यांहून अधिक शिक्षकांच्या जागा भरण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.

जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना आंदोलने करावी लागत होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून सुरू असलेली पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती पूर्ण होत आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पवित्र पोर्टलमार्फत ३३६ शिक्षकांची नियुक्ती केली होती. काही शिक्षकांना लोकसभेपूर्वी तर काहींना निवडणुकीनंतर पदस्थापना मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा १४९ पदवीधर शिक्षकांची तर उर्दू माध्यमासाठी ३३ शिक्षकांची नियुक्ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झाली आहे. त्यामुळे जिल्हाभरात नवीन ५१८ शिक्षक मिळाले आहेत. तसेच इतर जिल्ह्यांतून बदलीने आलेल्या शिक्षकांची संख्या १४० एवढी आहे. त्यात आणखी ६० ते ७० जणांची भर पडणार असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. त्यामुळे नव्याने जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांचा आकडा ७०० पार जाणार आहे. १८२ शिक्षक पदवीधर असल्यामुळे गणित, विज्ञान विषयाच्या अध्यापनाची चिंता कमी होणार आहे.

८ हजार १७७ शिक्षकांची पदे मंजूर
जिल्ह्यातील जि.प. शाळांमध्ये एकूण ८ हजार १७७ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यातील ९५ टक्क्यांहून अधिक पदे भरण्यात आली. जिल्हा बदलीने आलेले शिक्षक रुजू झाल्यानंतर हा आकडा ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे रिक्त जागांची संख्या अत्यल्प राहणार असल्याचेही शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

आता ९ ऑगस्टला समुपदेशन
पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी ७ ऑगस्टला समुपदेशन फेरीचे आयोजन केले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांनी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हे समुपदेशन ९ ऑगस्ट रोजी जि.प. सभागृहात सकाळी १० वाजता ठेवले आहे.

Web Title: Zilla Parishad schools got 518 new teachers in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.