जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या रद्द; शिक्षण समितीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 07:21 PM2020-08-01T19:21:14+5:302020-08-01T19:25:57+5:30
जि. प. शिक्षण समितीची बैठक सभापती अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी घेण्यात आली.
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि शिक्षक सर्वेक्षणासह इतर कामांत व्यस्त असल्यामुळे यंदा जि. प. शिक्षकांच्या बदल्या न करण्याचा निर्णय शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याचवेळी आरोग्य कर्मचाऱ्यांच्याही बदल्या रद्द केल्या असल्याची माहिती शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी दिली.
जि. प. शिक्षण समितीची बैठक सभापती अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी घेण्यात आली. शिक्षकांनी कोविड योद्धा म्हणून सर्वेक्षण, चेकपोस्टवर तपासणी आणि वाळूज, बजाजनगर परिसरात कोरोनाची साखळी तोडण्यामध्ये महत्त्वपूर्ण काम केल्याबद्दल शिक्षकांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे यावर्षी बदल्या न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याचवेळी जि. प. माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या तातडीने बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. आरोग्य समितीचीही बैठक यावेळी घेण्यात आली. या बैठकीत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याचा सीईओंचा निर्णय बदलण्यात आला नाही.
ग्रामीण भागात आधार कार्ड तपासून प्रवेश
जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षेच्या वेळी कॉपी करता येते, यासाठी शहरासह पुण्या, मुंबईतील विद्यार्थी प्रवेश घेतात. ही महाविद्यालये केवळ बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठीच चालविली जातात, असा आरोप सदस्यांनी यावेळी केली. यावर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश देताना आधार कार्ड तपासणी केल्याशिवाय प्रवेश देऊ नये, असे ठरविण्यात आल्याचे सभापती अविनाश गलांडे यांनी सांगितले.