जि.प.३, पं.स.चे ११ अर्ज बाद
By Admin | Published: February 3, 2017 12:34 AM2017-02-03T00:34:24+5:302017-02-03T00:36:51+5:30
बीड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छानणी प्रक्रिया गुरूवारी पूर्ण झाली.
बीड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छानणी प्रक्रिया गुरूवारी पूर्ण झाली. विविध त्रुटींमुळे जि. प. चे ३, तर पं. स. चे ११ अर्ज बाद झाले. अंबाजोगाई, शिरूर कासार, गेवराईमध्ये जि. प. चे सर्व अर्ज वैध ठरले असून, काही ठिकाणी आक्षेप आल्याने निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.
बीड तालुक्यातील ८ गटांसाठी १५५, तर पं. स. च्या १६ गणांसाठी २८२ नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. त्यापैकी जि.प.चे २, तर पंचायत समितीचे ३ असे एकूण ५ अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले. जिल्हा परिषदेसाठी चौसाळा गटातील महेंद्र बोराडे व लिंबागणेश गटातील निकिता स्वप्नील गलधर यांचे अर्ज अवैध ठरले. पाली गणातील देवकर पिराजी, बहिरवाडी गणातील रशीदा बेगम, शेख फराह बेगम यांचे उमेदवारी अर्जही बाद ठरले.
आष्टीत ३ अर्ज अवैध
आष्टीमध्ये ३ उमेदवारी अर्ज अवैध ठरले. जिल्हा परिषदेसाठी आलेल्या ५९ अर्जांपैकी कडा गटातील ज्ञानेश्वर चौधरी यांचा अर्ज अवैध ठरला, तर लोणी गणातील संध्याराणी पांडूळे, चंद्रकांत करडळे, अजित गिरे यांचे अर्ज अवैध ठरले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रामेश्वर गोरे यांनी सांगितले.
गेवराईत जि. प. चा एकही अर्ज अवैध नाही
गेवराई तालुक्यात ९ गटांसाठी ९७ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, यातील सर्व अर्ज वैध ठरले. १८ गणांसाठी १७७ जणांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी आंतरवली गणातून किश्किंदा राधाकिसन शिंदे यांचा एकमेव अर्ज सूचक गणाबाहेरील असल्याने अवैध ठरला आहे.
अंबाजोगाई पं. स.च्या
२ उमेदवारांचे अर्ज बाद
जिल्हा परिषदेच्या सहा गटासाठी ७३ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत, तर पंचायत समितीच्या बारा गणांसाठी १२७ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले.
जिल्हा परिषदेच्या सहा गटासाठी ७३ उमेदवारांचे ७९ उमेदवारी अर्ज दाखल झाल होते. तर पंचायत समितीच्या १२ गणांसाठी १३० उमेदवारांचे १५२ उमेदवारी अर्ज दाखल झाल होते. आज झालेल्या छाननी प्रक्रियेत जिल्हा परिषद उमेदवारांचे ७३ अर्ज वैध ठरले. तर पंचायत समितीच्या २ उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर एका अर्जावरील आक्षेपाचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. जवळगाव गणातील पांडुरंग संतराम दहिवाडे यांनी उमेदवारी अर्जासोबत शौचालय घोषणापत्र न जोडल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला.तर जवळगाव गणातीलच बंडू विश्वनाथ उदार यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सादर केल्याची पावती न जोडल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला. तर चनई गणातील सतीश महीपती केंद्रे यांच्या उमेदवारी अर्जावर त्यांना तीन आपत्ये असल्याच्या आक्षेप नोंदविण्यात आला आहे. या अर्जावरील निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
शिरूरमध्ये पं. स. चे २ अर्ज बाद
येथे जि. प. चे सर्व अर्ज वैध ठरले. पं. स. चे २ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. रायमोहा, पाडळी गणातून प्रत्येकी एक अर्ज बाद ठरला आहे.
पाटोदा, माजलगावात
उशिरापर्यंत छानणी
माजलगाव व पाटोदा तालुक्यात गुरूवारी रात्री उशिरापर्यंत अर्ज छानणीचे काम सुरू होते. माजलगावात ६ गट व १२ गण तर पाटोद्यात ३ गट व ६ गण आहेत. (प्रतिनिधी)