जि.प. इमारत बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण
By Admin | Published: November 16, 2014 11:06 PM2014-11-16T23:06:42+5:302014-11-16T23:39:09+5:30
बीड : जिल्हा परिषदेच्या नुतन इमारत बांधकामाची निविदा प्रक्रिया शनिवारी निश्चित झाली असून आता विशेष सर्वसाधारण सभा घेऊन त्यात अंतिम मंजुरी घेतली जाणार आहे़
बीड : जिल्हा परिषदेच्या नुतन इमारत बांधकामाची निविदा प्रक्रिया शनिवारी निश्चित झाली असून आता विशेष सर्वसाधारण सभा घेऊन त्यात अंतिम मंजुरी घेतली जाणार आहे़
इमारत बांधकामसाठी ई- टेंडरींगची प्रक्रिया राबविली होती़ त्यानुसार चार कन्स्ट्रक्शनकडून प्रस्ताव आले होते़ मात्र, दोन प्रस्ताव रद्द ठरले होते़ शेवटी राज व निर्मिती या दोनच कन्स्ट्रक्शनचे प्रस्ताव शिल्लक राहिले होते़ शनिवारी बंद लिफाफे उघडण्यात आले़ त्यात औरंगाबाद येथील निर्मिती कन्स्ट्रक्शनची निविदा एकूण रक्कमेच्या ७.८१ टक्के इतक्या कमी दराची असल्याने ती अंतिम होण्याची शक्यता आहे़ इमारत बांधकाम हा अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या अजेंड्यावरील विषय आहे़ त्यामुळे सर्वसाधारण सभा बोलावून त्यात निर्मिती कन्स्ट्रक्शनला बांधकाम करण्याची जबाबदारी सोपविली जाऊ शकते़ दरम्यान, सर्वसाधारण सभा लवकरच बोलाविण्यात येणार असून या बैठकीत अंतिम मंजुरी दिली जाणार असल्याचे जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सांगितले. मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित कन्स्ट्रक्शनकडून सुप्रिमो डिपॉझिट घेण्यात येणार आहे. त्यानंतर बांधकामाला सुरूवात होईल. बांधकाम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी अल्टिमेटम देण्यात येणार आहे, अशी माहिती जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर. शेंडे यांनी दिली.
इमारत पाडण्यासाठीही ई- टेंडरींग
जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या जागेतच नवी इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आता आहे ही इमारत पाडण्यात येणार आहे. त्यासाठी देखील ई- टेंडरींग प्रक्रिया करण्यात येणार आहे. शिवाय इमारतीमधील साहित्याचा लिलाव करून त्याचा पैसाही बांधकामासाठी वळविण्यात येणार आहे.
आठ दिवसाला आढावा
जिल्हा परिषदेच्या इमारत बांधकामावर आपला कायम ‘वॉच’ राहणार आहे. अद्ययावत इमारत उभारत असताना कोठेही बांधकामाचा दर्जा घसरणार नाही याची दक्षता घेतली जाईल. त्यासाठी आठ
दिवसाला आढावा घेतला जाणार आहे,असे जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सांगितले. (प्रतिनिधी)