जिल्ह्यातील जि.प. शिक्षक झाले तंत्रस्रेही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 11:20 PM2017-08-17T23:20:05+5:302017-08-17T23:20:05+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल झाल्या असून शाळेतील सर्वच शिक्षक तंत्रस्रेही झाले असून राज्यात शिक्षक तंत्रस्रेही होणारा पहिला हिंगोली जिल्हा असल्याची माहिती शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी दिली
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल झाल्या असून शाळेतील सर्वच शिक्षक तंत्रस्रेही झाले असून राज्यात शिक्षक तंत्रस्रेही होणारा पहिला हिंगोली जिल्हा असल्याची माहिती शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी दिली.
प्रगत शैक्षणिक उपक्रमाचे वारे जिल्ह्यात वाहत आहे. ज्ञान रचनावादाने शिक्षक अध्यापन करीत असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने प्रगत होत आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ८८३ शाळा असून त्यामध्ये तीन हजार ९७७ शिक्षक आहेत.
या सर्व शाळांतील शिक्षक तंत्रस्रेही झाल्यानिमित्त १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड यांच्या उपस्थितीत जिल्हा तंत्रस्रेही झाल्याची घोषणा करून शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांचा सत्कार करण्यात आला. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापन कसे करावे या बाबत शिक्षकांना दोन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्ह्यातील प्रत्येक गावांतून लाखो रूपयांची लोकवर्गणी जमा करून शिक्षकांनी शाळा डिजिटल केल्या. डिजिटल शाळांचा अध्यापनात उपयोग व्हावा, यासाठी कोणता घटक कसा शिकवायचा, शैक्षणिक अॅप कसे बनवायचे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी मागे न राहता तोही जगाच्या प्रवाहात यावा यासाठी तंत्रज्ञानाने शिकविण्याचे तंत्र शिक्षकांना देण्यात येवून त्यांना तंत्रस्रेही बनविण्यात आले.तंत्रस्रेहीच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना इंटरनेचा व मोबाईलच्या माध्यमातून जगातील नवनवीन ज्ञान देत आहेत.