जि.प.,पं.स. निवडणुकीतील ७७ पराभूत उमेदवार पाच वर्षांसाठी झाले अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:20 AM2017-12-02T00:20:00+5:302017-12-02T00:20:10+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्च मुदतीत सादर न केल्याने ७७ पराभूत उमेदवारांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाच वर्षे अपात्र घोषित करण्याची कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्च मुदतीत सादर न केल्याने ७७ पराभूत उमेदवारांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाच वर्षे अपात्र घोषित करण्याची कारवाई केली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या या निवडणुकीत अनेक उमेदवार मैदानात होते. काही विजयी झाले तर काही पराभूत झाले. विजयी, पराभूत झालेल्या उमेदवारांनी प्रचारासाठी केलेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक होते. विजयी झालेल्या उमेदवारांनी सादरही केला; पण पराभूत झालेल्या उमेदवारांनी खर्च सादर केला नाही.
जि.प.चे २३ आणि पंचायत समितीच्या ५४ अशा एकूण ७७ पराभूत उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उमेदवारांना नोटिसा बजावल्या. त्यानंतरही त्यांनी निवडणूक खर्च सादर केला नाही. म्हणून या सर्व उमेदवारांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरविले आहे.