जि.प. शाळाखोल्या बांधकाम; दुरुस्ती घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:34 PM2019-06-03T23:34:34+5:302019-06-03T23:35:25+5:30
जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळाखोल्यांचे बांधकाम आणि दुरुस्तीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी २०१६ मध्ये क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सोमवारी घेतला. या गुन्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे तत्कालीन दोन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य अधिकारी आहेत.
औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळाखोल्यांचे बांधकाम आणि दुरुस्तीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी २०१६ मध्ये क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सोमवारी घेतला. या गुन्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे तत्कालीन दोन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य अधिकारी आहेत.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी, तत्कालीन शिक्षण अधिकारी नितीन उपासणी, जि.प. बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता भारत बाविस्कर, लेखाधिकारी विलास जाधव यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथील एका साप्ताहिकाचे संपादक रऊफ न्याजू पटेल यांनी जिल्हा परिषद शाळाखोल्या बांधकाम आणि दुरुस्तीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात केली होती. न्यायालयाच्या आदेशाने १६ मार्च २०१६ रोजी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात याविषयी भादंवि कलम ४०६, ४०९, ४६७, ४७१, १२०(ब) आणि ३४ अन्वये गुन्हा नोंद झाला होता. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. नंतर त्यांची बदली झाल्याने हा तपास थांबला. याबाबत माहिती मिळताच, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य आणि आरोपींमध्ये दोन आयएएस दर्जाचे अधिकारी असल्याने गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने करावा, असे आदेश दिले. त्यानुसार क्रांतीचौक पोलिसांकडून या गुन्ह्यासंबंधी सर्व कागदपत्रे सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त झाले. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांनी तपास सुरू केला.